हापूस पेटीला लाखाचा भाव; घाऊक व्यापारी हवालदिल

रत्नागिरी:- हापूसच्या एका पेटीला मुंबईतील एक लाख आठ हजार रुपये दर मिळाल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. लाखमोलाच्या लिलावामुळे घाऊक फळ बाजारातील व्यापारी हवालदिल झाले आहेत तर बागायतदारांनीही या दरात सातत्य ठेवण्यासाठी मागणी केली आहे. लिलावातील एकाच पेटीला लाखाचा दर, उर्वरित पेटीला तिन पट कमी दर दिल्यामुळे प्रक्रियेवरच बागायतदारांनी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे.

यंदा हवामानातील बदलांमुळे कोकणातील हापूसवर संक्रात आली आहे. जानेवारी महिन्यात मुंबई पुण्यात देवगडची मुहूर्ताची पेटी आली. त्यानंतर कोकणातून काही शेकडोच्या पेट्या मुंबईत दाखल होऊ लागल्या. गतवर्षी कोरोनामुळे फळ बाजारावर परिणाम झाला होता. ऐन हापूस आंब्याच्या मोसमात सुरू झालेला हा प्रादुर्भाव कोकणातील हापूस आंबा बागायतदारांच्या जीवावर उठणारा होता. त्या वेळी आंबा बागायतदारांनी थेट विक्रीचा फंडा अवलंबला होता. राज्याच्या कानाकोपर्‍यात हापूसची याच पध्दतीने विक्री झाली. त्यामधून कोकणातील आंबा बागायतदारांना चांगला मोबदला मिळाला. याच पध्दतीने यंदाही काही बागायतदारांनी पावले उचलण्यास सुरवात केली आहे. मार्च महिन्यात यंदा तुलनेत कमी पेट्या येत आहेत.हापूस आंब्याची डिजिटल विक्रीसाठी काही संस्था पावले टाकत आहेत. मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेल्या जाहीर लिलावात हापूसला मुहूर्ताच्या पेटीला एक लाख आठ हजारांची बोली लागली. आतापर्यंत एवढा दर प्रथमच मिळाला आहे. त्यामुळे व्यापारी हवालदिल झाले आहेत. मुंबईतील व्यापारी जेवढा दर देतील तेवढा दर बागायतदार आतापर्यंत स्विकारत होते. यावरुन व्यावसायिकांसह बागायतदारही थोडासा चिंताग्रस्त झाला आहे. हापूस चांगला दर मिळावा यासाठी बागायतदार प्रयत्नशील आहे. लाखमोलाच्या बोलीमुळे व्यापारी दर चांगला देतील असा अंदाज काही जणांकडून व्यक्त केला जात आहे; मात्र काही बागायतदारांनी या बोलीवरच प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे. एकाच पेटील लाखाचा दर पण उर्वरित बोलींना दर कमी का दिला गेला. अन्य बागायतदारांकडून लिलावात मिळालेल्या दराप्रमाणेच दर मिळावा अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे.यंदा आवक कमी होण्याची शक्यता असून बागायतदार थेट विक्रीसाठी प्रयत्नशील आहेत.