रत्नागिरी:- सध्या संचारबंदीमुळे कोकणातील हापूस आंबा जिल्ह्यात पोहोचवणे आंबा बागायतदारांना कठीण झाले आहे. त्यावर मार्ग काढण्यासाठी एसटी महामंडळ शेतकरी ते ग्राहक संकल्पना यशस्वी करण्यासाठी किसानरथ वाहतूक सेवा सुरू करणार आहे. त्यात भाग घेण्यासाठी बागायतदारांनी आगार व्यवस्थापकांशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.
एसटी महामंडळाच्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ही सेवा देण्यात येणार आहे. गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीही आणि आंब्याच्या मोसमात कडक संचारबंदी सुरू आहे. त्यामुळे आंबा बागायतदारांना आपला माल मुंबई-पुण्याच्या बाजारपेठेत पाठवणे कठीण झाले आहे. त्यासाठी एसटी महामंडळ किसानरथ वाहतूक सेवा सुरू करणार आहे. रत्नागिरी, लांजा, राजापूर, देवरूख, चिपळूण यासह वेंगुर्ला, मालवण, देवगड, विजयदुर्ग, कुडाळ या डेपोतून आंब्याच्या पेट्या जमा करून पनवेल, वाशी, ठाणे, कुर्ला, परेल, मुंबई सेंट्रल, बोरिवली या डेपोत आंबापेट्या पोहोचवल्या जाणार आहेत. या वाहतुकीसाठी स्पर्धात्मक दर ठरवले आहेत.
मुंबईतील ग्राहकांसाठी त्यांच्या आंब्याच्या पेट्या डेपोत जमा करण्याची सोय केलेली आहे. तेथून ग्राहकाने त्या घेऊन जायच्या आहेत. त्यामुळे आंबा बागायतदारांनी स्थानिक आगार व्यवस्थापकांशी संपर्क साधावा, असे आवाहन रत्नागिरी एसटी विभागाने केले आहे. खोका वजनामुळे फाटू शकतो. तळातील आंबापेटीवर दाब पडून काहीवेळा लाकडी खोकाही तुटण्याचा संभव असतो. हे टाळण्यासाठी पेट्या बसविताना योग्य नियोजन केले जाईल. गतवर्षी एसटीने एकूण 3500 आंबा पेट्यांची वाहतूक मुंबई, बोरीवली, ठाणे, पुणे, अकोला, औरंगाबाद, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, जळगाव आदी जिल्ह्यात केली होती.