निर्यात वाढण्याची शक्यता
रत्नागिरी:- युरोपियन देशांच्या समुहातून इंग्लंड बाहेर पडल्यानंतर विविध वस्तूंच्या आयातीवर यावर्षी शिथिलता आणण्यात आली आहे. यामध्ये इंग्लंडने हापूसवरील उष्णजल प्रक्रियेचे निर्बंध शिथिल केले आहेत. त्याचा फायदा कोकणातील हापूसच्या निर्यातीत सुमारे तीस ते चाळीस टक्क्यांनी वाढ होणार आहे. यापुर्वी या जाचक अटीचा फटका आंबा निर्यातीला बसला होता. मात्र पॅक हाऊस व पॅकिंग करण्याचे बंधन कायम ठेवण्यात आले आहे.
भारतात फळमाशीचा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर युरोपिअन देशांसह इंग्लंडने आंबा आयात करताना अनेक निर्बंध लादले होते.उष्णजल प्रक्रियेचे बंधन घातल्यामुळे त्याचा मोठा परिणाम हापूसच्या निर्यातीवर झाला होता.उष्णजल प्रक्रिया करुन आंबा निर्यात करताना त्यामध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे बागायतदारांनी इंग्लंडसह युरोपियन देशांकडे आंबा पाठविण्याकडे काही अंशी पाठ फिरविली होती.
देशभरातून दरवर्षी विविध प्रकारच्या आंब्याची पन्नास हजार मेट्रीक टन एवढी निर्यात विविध देशांमध्ये केली जाते. यामध्ये इंग्लंडला ३ ते ४ हजार मेट्रीक टनापर्यंत निर्यात करण्यात येते. यामध्ये कोकणातील २० टक्के हापूसचा समावेश आहे. दरवर्षी सरासरी ६०० मेट्रीक टन हापूस इंग्लंडमध्ये जातो. युरोपीअन देशांसाठी उष्णजल प्रक्रिया आवश्यक होती. फळमाशीवर नियंत्रणासाठी ४८ अंश सेल्सिअस तापमानाला ६० मिनिटे फळ पाण्यात ठेवून ही प्रक्रिया होते. त्यासाठी लासलगाव आणि वाशीसह रत्नागिरीतील पॅकहाऊसमध्ये सुविधा आहे. युरोपियन देशांच्या समुहातून इंग्लंड बाहेर पडल्यानंतर विविध वस्तूंच्या निर्यातीवर यावर्षी शिथिलता आणली गेली. त्यानुसार भारतामधून निर्यात होणार्या १६ वस्तूंचा समावेश आहे. याचा फायदा भारतामधून निर्यात होणार्या हापूसला होणार आहे.
उष्णजल प्रक्रियेमुळे पातळ साल असलेल्या हापूसचा दर्जा घसरत होता. यावर पणनने अभ्यास करुन निकष बदलाची मागणी केली होती. त्यावर निर्णय झालेला नाही. परंतु इंग्लंडने निर्बंधात दिलेल्या शिथिलतेचा फायदा अनेक बागायतदारांना होणार आहे; मात्र आंब्याचा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी शासनाकडून प्रोटोकॉल निश्चित करण्याची मागणी व्यावसायिकांकडून होत आहे. मात्र हापूसची निर्यात करताना पॅकहाऊसमध्येच पॅकिंग करण्याची अट इंग्लंडने कायम ठेवली आहे.









