हापूसच्या कलमांना धरली कैरी; फेब्रुवारीच्या पंधरवड्यात हापूस बाजारात 

रत्नागिरी:-गेल्या काही दिवसात हापूसला पोषक थंडीला सुरवात झाल्यामुळे तिसर्‍या टप्प्यातील मोहोर येण्यास आरंभ झाला आहे; मात्र पौष महिन्यात येणार्‍या मोहोराचे व्यवस्थित सेटींग होत नाही. परिणामी अपेक्षित उत्पादन येणार नाही अशी भिती काही बागायतदारांनी व्यक्त केली. तर अवकाळीमधून वाचलेल्या मोहारातून तयार झालेली कैरीही हळूहळू परिपक्व झाली आहे. त्याची फळं फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवड्यात बाजारात येतील असा अंदाज आहे.

यंदा मोसमी पाऊस लांबला आणि नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात अवकाळीने गोंधळ घातला होता. त्याचा परिणाम हापूसवर झाला आहे. एक महिन्यांनी हंगाम लांबला आहे. अवकाळी पावसामुळे आंबा बागांना आलेला मोहोर गळून गेला तर काही ठिकाणी तो काळवंडला. पहिल्या टप्प्यात आलेल्यापैकी अवघा पाच टक्केच मोहोर शिल्लक राहीला. त्यामधून हळूहळू उत्पादन मिळण्यास सुरवात झाली आहे. त्यातही काही ठिकाणी आलेल्या कैरीवर काळे डाग पडलेले आहेत. त्यावेळी बुरशीजन्य रोग, तुडतुडा यांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी बागायतदारांनी पालवी आणि मोहोरावर कीटकनाशकाच्या फवारण्या कराव्या लागल्या. अपेक्षेपेक्षा दोन ते तीन फवारण्याच्या जादाच्या केल्या आहेत. त्याचा आर्थिक भुर्दंड बागायतदारांना सहन करावा लागला आहे.
डिसेंबर महिन्याच्या अखेरीस थंडीला सुरुवात झाली आणि पहिल्या, दुसर्‍या टप्प्यातील मोहोरातून कैरी बाहेर पडू लागली. तिसर्‍या टप्प्यातील मोहोर सध्या वेगाने येत आहे. पुढील पंधरा दिवस थंडीचा जोर कायम राहिल्यास तो मोहोर परिपक्व होऊन त्यामधून कैरी बाहेर पडू शकते. परंतु पौष महिन्यात आलेल्या मोहोरातून उत्पादन कमी मिळते असा अनेक बागायतदारांचा अनुभव आहे. त्यानुसार यंदा ही परिस्थिती उद्भवली असून तिसर्‍या मोहोरांचे सेटींग व्यवस्थित झाले नाही, तर शेवटच्या टप्प्यातील उत्पादनातही काही अंशी घट होऊ शकते.