हापूसच्या एक हजार पेट्या परदेशात रवाना; युद्धामुळे वाहतुकीच्या दरात वाढ

रत्नागिरी:- प्रमुख बाजारपेठांमध्ये आंब्याची आवाक कमी असली तरीही मार्च महिन्याच्या आरंभीला रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील हापूसच्या एक हजाराहून अधिक पेट्या वाशी बाजार समितीमधून दुबई, कुवेत, म्हस्कतकडे विमानाने रवाना झाल्या; मात्र युक्रेन-रशिया युध्दामुळे इंधन दर वाढीच्या शक्यतेमुळे वाहतुकीच्या दरात अडीचपट वाढ झाली आहे.

यंदा अवकाळी पाऊस, उशिराने पडलेली थंडी याचा परिणाम हापूसच्या हंगामावर झाला. वातावरणातील प्रतिकुल परिस्थितीचा सामना करत आंबा बागायतदारांनी वाशी, अहमदाबाद, पुणे सारख्या बाजारात हापूस पाठवण्यास सुरवात केली आहे. आवक कमी असल्यामुळे तुलनेत दर वधारलेेले आहेत. आखातील देशांकडून हापूसची मागणी वाढू लागल्यामुळे वाशी बाजारामधून हापूसच्या पेट्या विमानाने पाठविण्यास सुरवात केली आहे. दोन दिवसांपुर्वी वाशी बाजारातून एक हजार हापूसच्या पेट्या पाठवण्यात आल्या आहेत. यामध्ये रत्नागिरीतील आंब्याचे प्रमाण कमी आहे. सर्वाधिक सिंधुदुर्गमधील आंबा आहे. कोरोनामुळे गेली दोन वर्षे निर्यातीत अनेक अडचणी आल्या होत्या. यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरीही युक्रेन-रशियातील युध्दाचा परिणाम वाहतूकीच्या दरावर झालेला आहे. यंदाचे दर अडीचपट वाढलेले आहेत. दुबईला आंबा पाठवण्यासाठी पुर्वी 70 ते 80 रुपये किलोला घेण्यात येत होते; मात्र यंदा 180 ते 200 रुपये किलोमागे आकारण्यात येत आहेत. तसेच समुद्रमार्गेही हे दर वाढवण्यात आले आहे. सध्या आंबा कमी असल्याने ही वाहतूक अजुन चालू झालेली नाही. तरीही चाळीस टनाच्या एका कंटेनरसाठी पुर्वी 3500 डॉलर घेतले जात होते. सध्या त्याचाच दर 7 ते 8 हजार डॉलरवर गेला आहे. यामध्ये इंधन वाढीचा अधिभार अधिकचा आकारला जात असल्याचे वाशीतील व्यावसायीकांकडून सांगण्यात आले.
दरम्यान, वातावरणातील बदलांच्या परिणामामुळे वाशीत आलेली फळ देठाच्या बाजूने काळा पडत आहे. फळ पिकायला लागले की देठापासून भाग कुसून जात आहे. हा प्रश्‍न गेल्या आठ दिवसात आलेल्या फळांमध्ये दिसत आहेत.

रत्नागिरी, सिंधुदुर्गमधून गेल्या चार दिवसात दररोज 5 हजार 500 पेटी आंबा वाशी बाजारात जात आहे.
उन्हाचा कडाका वाढल्यामुळे दोन दिवसात आंबा तयार होण्याचे प्रमाण वाढेल आणि पेटी दहा हजारावर पोचेल. गतवर्षीप्रमाणेच यंदा स्थिती आहे; मात्र पाच डझनच्या पेटीचा दर एक ते दिड हजार रुपये अधिक आहे. सध्या दोन हजारपासून सहा हजार रुपयांपर्यंत दर आकारण्यात आहेत.