हापूसच्या अमेरिका वारीतील अडथळे दूर

रत्नागिरी:– कोरोनामुळे गेली दोन वर्षे अमेरीकेला होणारी निर्यातीत अडथळे निर्माण झाले होते. मात्र यंदा तो अडथळा केंद्र सरकाने दूर केला आहे. अमेरीकच्या कृषी विभागाकडून यंदाच्या हंगामात भारतीय आंब्याच्या निर्यातीसाठी मंजुरी दिली आहे. त्यामुळे अमेरीकन ग्राहकांना उत्कृष्ट प्रतीचे भारतातून पाठविलेले आंबे उपलब्ध होणार आहेत. हापूसला अमेरिकेत मोठी मागणी आहे.

अमेरिकेच्या कृषी विभागाकडून मिळालेल्या निर्यात मंजुरीमुळे महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, आंध्रप्रदेश तसेच तेलंगणा या भागातील उत्पादीत आंब्यांच्या निर्यातीचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयामुळे भारताच्या उत्तर तसेच पूर्व भागातील उत्तरप्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल यासारख्या राज्यांमध्ये उत्पादित होणार्‍या लंगडा, दशहरी, फझली आदी आंब्यांसह कोकणातील हापूसची चव अमेरीकन ग्राहकांना चाखावयास मिळणार आहे. देशभरातून अमेरिकेला 1 हजार टन आंबा निर्यात होतो. त्यामध्ये तीनशे टन हापूस आहे. अमेरिकेत सर्वाधिक हापूसला मागणी आहे. कोरोनामुळे थांबलेली निर्यात पुन्हा एकदा सुरु होणार आहे. तसेच 2022 मधील आंबा निर्यात 2019-20 पेक्षा अधिक असेल असा अंदाज निर्यातदारांनी वर्तविला आहे.कोविड महामारीमुळे आंतरराष्ट्रीय प्रवासावर लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे, अमेरिकेच्या कृषी विभागातील निरीक्षकांना आंब्यांवरील विकिरण सुविधेची तपासणी करण्यासाठी भारतात येणे शक्य होत नव्हते. त्यामुळे 2020 पासून भारतीय आंब्यांच्या अमेरिकेत होणार्‍या निर्यातीवर निर्बंध लावण्यात आले होते. 23 नोव्हेंबर 2021 रोजी 12 वी भारत-अमेरिका व्यापार धोरण मंचाची बैठक झाली. त्यातील निर्णयांना अनुसरून भारताचे कृषी मंत्रालय आणि अमेरिकेचा कृषी विभाग यांच्या दरम्यान परस्परांच्या कृषी बाजारांमध्ये मालाला प्रवेश देण्याचा करारावर झाला. या करारानुसार, भारतीय आंबे तसेच डाळिंबे यांची अमेरिकेला निर्यात होणार असून अमेरिकेची चेरी आणि अल्फाल्फा ही पिके भारतात आयात होणार आहेत. यासाठी विकिरण प्रक्रिया अत्यावश्यक करण्यात आली आहे.