रत्नागिरी:- दुसर्या टप्प्यातील आंबा फळबाजारात जाण्यास सुरवात झाला असून नवी मुंबईच्या बाजार समितीत हापूसची आवक वाढली आहे. पाठोपाठ करोनामुळे पुरवठा अधिक आणि ग्राहक कमी यामुळे हापूसचे दर आठवडाभरात दोन हजार रुपयांनी खाली आले आहेत. अचानक दर घसरल्याने बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दर टप्प्यात आल्यामुळे स्थानिक बाजारात अनेकांनी हापूसची चव चाखण्यास सुरुवात केली.
हापूसचा दर एप्रिलच्या मध्यापर्यंत वधारलेला होता.दुसर्या टप्प्यातील उत्पादन मागील चार दिवसात सुरु झाले आहे. वाशी फळ बाजारात प्रतिदिन 34 ते 45 हजार पेटी जाते. संचारबंदीमुळे बहूतांश लोक बाहेर पडत नाही. नियमानुसार सकाळी 7 ते 11 या कालावधीत व्यापार्यांना विक्रीसाठी मुभा दिली आहे. सकाळच्यावेळी ग्राहक कमी असतो. तसेच हापूसच्या बरोबरीने कर्नाटकमधील आंबाही मोठ्या प्रमाणात दाखल झाला असून 35 ते 40 रुपये किलो दर आहे. या सर्वाचा परिणाम हापूसच्या दरावर होत आहे. ग्राहकांची मागणी असलेल्या पाच ते सहा डझनची पेटीचा दर सर्वसाधारणपणे 4 ते 5 हजार रुपये होता. या आठवड्यात तो 3 हजार रुपयांपर्यंत आला आहे. त्या खालोखाल दर्जा कमी असलेल्या आंब्याचा दर 1 हजार रुपयांपर्यंत खाली आला.