रत्नागिरी:- हापूसची चव देशाच्या कानाकोपर्यातील लोकांपर्यंत पोचवण्यासाठी इनोटेरा कंपनीने पुढाकार घेतला असून त्यासाठी रत्नागिरीतील बागायतदारांशी चर्चा केली. जीआय प्राप्त हापूसचे मार्केटिंग ही कंपनी करणार असून त्यासाठी फार्मा प्रोड्युसर कंपनी स्थापन करावी लागणार आहे.
रत्नागिरीतील एका खासगी हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत हापूसच्या मार्केटिंगविषयी चर्चा झाली. या वेळी कंपनीतर्फे दीपक भन्साळ यांच्यासह पणनचे मिलिंद जोशी, आंबा उत्पादक संघाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप सावंत, अभय पटवर्धन, तुकाराम घवाळी, दत्ताराम तांबे, मन्सूर काझी यांच्यासह गोळपमधील आंबा बागायतदारही उपस्थित होते. जीआय प्रमाणपत्र घेतलेल्या बागायतदारांकडील हापूस ही कंपनी विकत घेणार आहे. त्यासाठी साडेसातशे बागायतदारांची फार्मा प्रोड्युसर कंपनी स्थापन करावी लागेल. त्याचे सभासद होण्यासाठी दोन हजार रुपये भरावे लागणार आहेत. इनोटेरा कंपनी त्यासाठी मदत करेल. त्यांच्याकडील आंबा निर्यातही करणार आहे.या संदर्भात अंतिम निर्णय फेब्रुवारी अखेरीस घेतला जाणार आहे. या कंपनीने देवगड हापूसच्या मार्केटिंगसाठी गतवर्षी पावले उचलली होती.
फळ तयार आणि स्वच्छ असावे, अशी अट कंपनीची आहे. चार ते दहा डझनपर्यंतचे फळ घेण्याची कंपनीची तयारी आहे.बागायतदारांनी सभासद शुल्क कमी करण्याची मागणी केली. खरेदीचे दर बागायतदार ठरवतील. कंपनीला परवडणार असेल तरच ते स्वीकारावेत. जागेवर खरेदी केल्यामुळे बागायतदारांना फायदा अधिक मिळू शकतो, असा विश्वास व्यक्त केला. आंबा खरेदी केल्यानंतर आठ दिवसात बागायतदारांना कंपनी पैसे देणार आहे; मात्र बागायतदारांनी त्वरित रकम मिळावी, अशी सूचना केली आहे.