रत्नागिरी:- काजळी नदीचे पाणी रस्त्यावर भरल्यामुळे बाजू पट्टीचा अंदाज न आल्याने रत्नागिरी हातीस एसटी आडकरवाडी येथे गटारात कलंडली. चालकाने प्रसंग सावधान दाखवून गाडी कलंडलेल्या स्थितीत ३२ प्रवाशांना गाडीतून सुखरुप उतरवत सुरक्षीत बाहेर काढले. हा प्रकार मंगळवारी (ता. ५) दुपारी २ वाजण्याचा सुमारास घडला.
रत्नागिरी शहर वाहतूकीची रत्नागिरी हातीस (एमएच २० बीएल १४९६) घेवून चालक विजय भद्रे हे दुपारी १.३० वाजता रत्नागिरी शहर बसस्थानकातून हातीसच्या दिशेने निघाले. माळनाका येथे विद्यार्थी, प्रवासी गाडीत बसले. दिवसभर सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे काजळी नदी दुथडी भरुन वाहत आहे. नदीचे पाणी पात्राबाहेर आल्यामुळे रत्नागिरी हातीस रस्त्यावर आडकरवाडी येथे गुडघाभर पाणी साचलेले होते. याच पाण्यातून मार्ग काढत एसटी बस पुढे जात असताना आडकरवाडी येथील मोरीजवळ समोरुन आलेल्या दुचाकीला बाजू देत असताना एसटी बस रस्त्याच्या डाव्या बाजूला चरात कलंडली. एसटी एका बाजूला कलंडतानाच विद्यार्थ्यांनी मोठा आरडाओरडा सुरु केला. या स्थितीत चालक विजय भाद्रे आणि वाहक रेश्मा जाधव यांनी प्रवाशांना धीर दिला. कलंडलेली एसटी पलटी होवू नये, याची खबरदारी घेत चालक भाद्रे यांनी प्रवाशांना एसटीतून बाहेर काढले. रस्त्यावर गुढगाभर पाणी असल्यामुळे त्यातून विद्यार्थ्यांना सुरक्षित नेण्यास प्राधान्य दिले गेले. विद्यार्थी प्रवास करत असलेली एसटी बस कलंडल्याची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, सरपंच कांचन नागवेकर, ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दिनकर सूर्य, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता शेळके, पोलीस हेडकॉन्सटेबल विनोद भितळे, राहुल पावसकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. तर एसटीच्या कार्यशाळेतील पथक घटनास्थळी दाखल झाले होते. सायंकाळी ५ वाजण्याचा सुमारास कलंडलेली एसटी मुख्य रस्त्यावर आणण्यात आली. एसटी वाहक, चालक यांनी दाखविलेल्या प्रसंग सावधानतेमुळे सर्व प्रवाशी या घटनेतून बाहेर पडले.









