हातीस, तोणदे गावाला वादळाचा तडाखा

नारळ, आंबा, काजू झाडे जमीनदोस्त

रत्नागिरी:- जिल्ह्यात सलग आठवडाभर संततधार पाऊस सुरु आहे. शुक्रवारी सायंकाळी अचानक रत्नागिरी तालुक्यातील तोंणदे, हातिस गावांना वादळाचा तडाखा बसला. येथील सुमारे साडेचारशे झाडांचे नुकसान झाले आहे. तसेच दापोली, संगमेश्‍वर तालुक्यात सहा घरांचे पाच लाखाचे नुकसान झाले.

मुसळधार पावसासह शुक्रवारी (ता. 17) सायंकाळी अचानक सुटलेल्या वादळी वार्‍यांने रत्नागिरी तालुक्यातील तोणदे, हातिस गावातील अवघ्या एक किलोमीटर परिसरातील सुपारी, नारळीच्या झाडांची वाताहात केली. तोंणदेतील शशिकांत वासुदेव लिमये यांची बाग या चक्रीवादाळाच्या तडाख्यात सापडली. सुमारे 350 हून अधिक पोफळींची झाडे जमिनदोस्त झाली होती. बागेतील नारळाची सहा झाडे उन्मळून पडली. काही पोफळींवर हिरवी सुपारी लगडलेली होती. ती खाली पडल्यामुळे लाखोचा फटका बसला आहे. सुमारे 50 ते 60 वर्षांची ही बाग होती. लिमये यांच्याबरोबरच आजूबाजूच्या सहा बागायतदारांना फटका बसला. यामध्ये 50 केळीची झाडेही उन्मळून पडली. तोंणदेबरोबरच हातीसमधील सहा नारळाची झाडे, फणसाच्या फांद्या मोडून पडल्या. येथील एक भले-मोठे जुने आंब्याचे कलम वार्‍याने भातशेतीतच पडले. त्यामुळे भाताची रोपे त्या झाडाखाली दबली गेली आहेत. या झाडावरुन दरवर्षी पन्नास ते साठ पेटी आंबा काढला जातो. त्या बागायतदाराचे लाखभर रुपयांचे नुकसान झाले आहे. कृषी पर्यवेक्षक माधव बापट, कृषी सेवक निलेश ठाकरे यांच्यासह सरपंच, पोलिसपाटील यांनी पाहणी करुन पंचनामा केला. या वादळामुळे सुमारे तीन ते चार लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.