उदय सामंत ; काम अपूर्ण असताना वसुली नको, पोलिस फोर्स मागे
रत्नागिरी:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अपूर्ण असताना हातिवले (ता. राजापूर) येथे पोलिस बंदोबस्तात सुरू करण्यात आलेली टोल वसूलीला दुसऱ्याच दिवशी पालकमंत्री उदय सामंत यांनी स्थगिती दिली. एक शिष्टमंडळ पालकमंत्र्यांना आज भेटल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण्याच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून हा निर्णय घेतला. टोल वसूलीला विरोध नाही, तर अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराला विरोध आहे. १४ तारखेला याबाबत बैठक घेऊन त्यावर निर्णय घेतला जाईल. तोवर तेथील पोलिस बंदोबस्त हटविण्यात आला असल्याचे सामंत यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत सभागृहामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पत्रकार परिषदेपूर्वी हातिवले येथील स्थानिकांचे एक शिष्टमंडळ पालकमंत्री उदय सामंत यांना भेटले.
चुकीच्या पद्धतीने टोल वसुली सुरू आहे. नियमाने रस्त्याचे ७५ टक्के काम पुर्ण झाल्यानंतर टोल वसूली करण्याचे अधिकारी ठेकेदाराला आहेत. परंतु रस्त्याची कामे अपूर्ण आहेत. त्यात पोलिस बंदोबस्तात ही टोल वसुली सुरू आहे. स्थानिकांनाही त्यातून दिलासा मिळालेला नाही. याबाबत पालकमंत्री उदय सामंत यांनी थेट प्राधिकरणाच्या अधिकारी आणि ठेकेदाराशी मोबाईलवरून चर्चा केली. स्थानिकांचा टोलला विरोध नाही. परंतु रस्त्याचे काम अपुर्ण असताना टोल का भरावा, अशी स्थानिकांची भावना आहे. त्याता अधिकारी मनमानी आणि दादागिरी करून पोलिस बंदोबस्तात वसुली सुरू केली आहे. उद्या तिथे काही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला तुम्ही जबाबदार रहाल, असे श्री. सामंत यांनी अधिकाऱ्यांना सुनावले.
याबाबत श्री. सामंत म्हणाले, हातिवले (राजापूर) राजापूर येथील टोल रस्त्याचे काम पुर्ण होईपर्यंत बंद करावा, अशी मागणी घेऊन स्थानिकांचे शिष्टमंडळ आले आहे. टोल पासून अकरा किमी अलिकडे आणि अकरा किमी पलिकडील स्थानिकांना यातुन सवलत द्यावी. ते नेहणी ये-जा करणार आहेत. तसेच चिरे, आंब्याची वाहतुक करणाऱ्या ट्रक व इतर व्यावसायिकांना टोलमध्ये सवलत द्यावी, अशी मागणी केली.
याबाबत मी संबंधीतांशी चर्चा केली. स्थानिकांचा टोल वसुलीला विरोध नाही. तर काम अपुर्ण असताना टोल वसुली करू नये आणि स्थानिकांना काही सवलत मिळावी. त्यामुळे तुर्तात टोल वसुलिला स्थगिती दिली आहे. १४ एप्रिलला याबाबत राजापूरत बैठक लावून त्यावर निर्णय केला जाणार आहे.