हातखंबा महामार्गावर वर्षभरात 4 हजार 883 वाहन चालकांवर कारवाई 

रत्नागिरी:- मुंबई – गोवा व मि-या – नागपूर या दोन राष्ट्रीय महामार्गांवरून जाणा-या वाहनांना शिस्त लावण्यासाठी महामार्ग वाहतुक पोलीस मदत केंद्र हातखंबा पोलिसांकडून विशेष मोहिम राबविण्यात आली होती. त्यामध्ये एकूण वर्षभरामध्ये 4,883 वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे.
 

याबाबत अधिक माहिती देताना महामार्ग वाहतुक पोलिस हातखंबा शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमर पाटील यांनी सांगितले की, गतवर्षी 1 जानेवारी 2020 ते 31 डिसेंबर 2020 या दरम्यान महामार्ग पोलिस महासंचालक ठाणे आदेशानुसार महामार्गावरील नियम तोडणा-या बेशिस्त वाहनचालकांवर व अवजड व अतिरिक्त भार वाहुन नेणा-या वाहनांवर दंडात्मक कारवाईची विशेष मोहिम राबविण्यात आली.

गतवर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे दोन्ही राष्ट्रीय महामार्गांवर वाहतुकीमध्ये घट झालेली होती. काही वाहनचालक नियमांचे उल्लंघन करतात त्याचा फटका इतर वाहनांना बसुन अपघात होतात त्यासाठी शिस्त लागण्यासाठी कारवाई केली जाते. गतवर्षी इंटरसेप्टर द्वारे अति वेगाने जाणाऱ्या 1889 वाहनांवर कारवाई केली, वाहन चालविताना मोबाईल वर चालकाने संभाषण करणे 38, वाहन चालविताना सीटबेल्ट न लावणे 1795, अवजड वाहनांना पुढे व मागे रिफलेक्टर न लावणे, अवजड ट्रेलर व ट्रक यांसारख्या वाहनांतून फाळका न लावता उघडपणे मोठे पाईप व लोखंडी सळई सारखे साहित्य वाहतूक करणे व दुचाकीवर हेल्मेट न घालणे 1161 व इतर प्रकारच्या वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल वर्षभरामध्ये 4,883 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे.

गतवर्षी या महामार्गावर प्राणांकित 61 अपघातांमध्ये 21 मयत झाले होते तर गंभीर जखमी 18 अपघातांपैकी 33 गंभीर जखमी झाले होते. तर किरकोळ 14 अपघातांमध्ये 17 किरकोळ जखमी झाले होते. तर विनादुखापतीचे 18 अपघात झाले असे एकूण 61 अपघात झाले आहेत. गतवर्षी  पेक्षा एकूण अपघात 50 ने कमी झाले आहेत. तर मयत होणा-यांचे प्रमाण 21 ने वाढले आहे. अपघात प्रवण ठिकाणी उपाययोजना केल्याने अपघातांचे प्रमाण कमी झाले आहे.