राजापूर:- राजापूर तालुक्यातील हसोळ तर्फे सौंदळ, रोग्येवाडी येथील एका वाहळातील नारळाच्या कॉडजवळ एका ५६ वर्षीय इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. हा प्रकार १२ जून रोजी दुपारी ३ वाजल्यापासून ते १६ जून रोजी दुपारी २:३० च्या दरम्यान घडला.
यशवंत दत्ताराम रोग्ये (वय ५६, रा. हसोळ तर्फे सौंदळ, रोग्येवाडी, ता. राजापूर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यशवंत रोग्ये हे त्यांचे चुलत भाऊ अर्जुन रोग्ये यांच्याकडे जातो असे सांगून घरातून बाहेर पडले होते. मात्र, ते परत न आल्याने कुटुंबीय आणि वाडीतील लोकांनी त्यांचा शोध सुरू केला. अखेर, त्यांचा मृतदेह मौजे हसोळ तर्फे सौंदळ, रोग्येवाडी येथील एका वाहळातील नारळाच्या कॉडजवळ आढळून आला.
या घटनेची नोंद राजापूर पोलीस ठाण्यात १६ जून २०२५ रोजी सायंकाळी ६:५९ वाजता अकस्मात मृत्यू क्रमांक ३२/२०२५, बी.एन.एस.एस. १९४ प्रमाणे करण्यात आली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला असून, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदनानंतरच स्पष्ट होईल.