रत्नागिरी:- हवामान विभागाचा अंदाज तंतोतंत खरा ठरला. मंगळवारी (ता. 21) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास जयगड पंचक्रोशीसह आजूबाजूच्या परिसरात वीस मिनिटे मुसळधार पावसाने झोडपले. अचानक सुरु झालेल्या पावसामुळे बागायतदारांची त्रेधातिरपीट उडाली. याचा परिणाम आंब्यावर होणार असून करप्याचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यापासून हापूस वाचवण्यासाठी औषध फवारणीचा खर्च वाढणार आहे.
रत्नागिरी व रायगड सह राज्यातील अन्य जिल्ह्यात मंगळवारी दुपारनंतर चार तासात वीजांच्या कडकडाटसह मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज मुंबई येथील वेध शाळेने व्यक्त केला होता. त्यानुसार सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास समुद्र किनारी परिसरात जयगड, खंडाळा, पन्हळी, वाटद, सैतवडे, जांभारी, कासारी, कचरे, वरवडेसह खाडी पट्ट्यात मुसळधार पावसाला सुरवात झाली. वेगवान वार्यासह सुरु झालेल्या पावसाने ग्रामस्थांची तारांबळ उडाली. खंडाळा बाजारपेठेत रस्त्यावरील फेरीवाल्यांनी सुरक्षित ठिकाणी साहित्य हलवले. त्यात अनेकांचे साहित्य भिजले. आंबा हंगाम सुरु असल्यामुळे अनेक बागायतदारांनी लाकडी पेटीचे साहित्य, गवत मोकळ्या जागेत ठेवले होते. ते पावसात भिजू नये यासाठी प्लास्टीकच्या कागदांनी झाकुन ठेवण्यासाठी धावपळ उडाली. या पावसामुळे आंबा, सुपारीसह काजूचे नुकसान होणार आहे. पावसाचा जोर वीस मिनीटे होता. याबाबत जयगड पंचक्रोशीतील बागायतदार आशीष भालेराव म्हणाले, या पावसामुळे जयगड पंचक्रोशीतील आंबा बागायतदार अडचणीत येणार आहेत. यंदा आंबा उशिराने आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर काही बागायतदारांनी आंबा काढून सायंकाळी मुंबईत बाजारात पाठविण्याची तयारी केली होती. पावसामुळे त्यात खंड पडला आहे. आंबा कमी आणि कामगार खर्च, कराराच्या बागांसाठीची गुंतवणूक, औषध फवारणी, वाहतूक यासाठी बँकांचे कर्ज बागायतदार घेतले आहे. या पध्दतीने अवकाळी पाऊस पडत राहिला तर परिस्थिती बिकट होईल.









