रत्नागिरी:- कोविड लसीकरणाची गती वाढविण्यासाठी केंद्र सरकारने १ जूनपासून गावपातळीवर हर घर दस्तक मोहीम राबविण्याची सूचना दिली आहे. त्यानंतर आरोग्य विभाग जोमाने कामाला लागला आहे. मागील २३ दिवसांमध्ये सुमारे ५० हजारांहून अधिक गृहभेटी पूर्ण करुन १५,२८५ व्यक्तींना कोविड प्रतिबंधात्मक लस देण्यात आली आहे.
लसीकरण मोहीम यशस्वीपणे राबवण्यात आल्याने कोविडच्या तिसऱ्या लाटेचा रत्नागिरी जिल्ह्याने प्रभावीपणे मुकाबला केला होता. आता चौथ्या लाटेचा प्रभाव दिसू लागला आहे. या चौथ्या लाटेचा सामना करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्याचा आरोग्य विभाग सज्ज झाला आहे.
जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेकडून तालुका व गावपातळीवर राबविण्यात येणाऱ्या हर घर दस्तक मोहिमेवर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये लक्ष ठेवून आहेत. ही मोहीम यशस्वीपणे राबविण्यासाठी आरोग्य सेविका, आरोग्यसेवक आणि आशासेविका त्या-त्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हद्दीतील गावे, वाड्यांमध्ये जाऊन प्रत्यके घरात भेटी देण्याचे काम करीत आहेत. ही मोहीम ३१ जुलैपर्यंत राबवण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात हर घर दस्तक मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी तब्बल ३५८ पथके तयार करण्यात आले आहेत. यामध्ये रत्नागिरी तालुक्यात ४९,खेड – ३०, संगमेश्वर – ४६,चिपळूण – ६०,दापोली – ५८,लांजा – २८, राजापूर – ४७, गुहागर – ३० तर मंडणगड तालुक्यात १० पथके कार्यरत आहेत. प्रत्येक पथकात आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आशा स्वयंसेविकेचा समावेश आहे.घरोघरी जाऊन नागरिकांना लसीचे महत्त्व पटवून देत आहेत.
आतापर्यंत १२ ते १८ वर्षे वयोगटातील ४,१६९ लाभार्थ्यां पैकी १,१५३ नागरिकांना पहिला डोस देण्यात आला आहे तर ५,८०६ लाभार्थ्यांना पैकी १,७१६ लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. १८ वर्षे पेक्षा अधिक वयोगटातील १५,१२९ लाभार्थ्यांपैकी ५,७६४ लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. १७,०४६ लाभार्थ्यां पैकी ६,६५२ नागरिकांना बूस्टर डोस देण्यात आला आहे.बूस्टर डोस आतापर्यंत ७५% नागरिकांना देण्यात आला आहे.









