हर्णे येथे मिनीबसला अपघात; १० प्रवासी जखमी

दापोली:- दापोली-हर्णे बायपास परिसरात आज दुपारी १२ ते १२:३० वाजण्याच्या सुमारास पुण्यातील पर्यटकांच्या एका मिनीबसला भीषण अपघात झाला. मिनीबस पलटी झाल्यामुळे झालेल्या या अपघातात १० प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने आसूड आणि दापोली येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

पुण्यातील पिंपरी चिंचवड (MH 14 GU 1616) येथे नोंदणीकृत असलेली ही मिनीबस पर्यटकांना घेऊन हर्णे परिसरात आली होती. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मिनीबसमध्ये पुण्यातील पाच कुटुंबे प्रवास करत होती. हे सर्व पर्यटक जवळील एका हॉटेलमध्ये थांबले होते आणि तेथून घरी परतण्यासाठी निघाले होते.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, हॉटेलमधून बाहेर पडताना चालकाचा अंदाज चुकला आणि रिव्हर्स घेत असताना मिनीबस थेट रस्त्यावर पलटी झाली. या अपघातामुळे एकच गोंधळ उडाला. स्थानिकांनी त्वरित धाव घेत बचावकार्य सुरू केले.

अपघातग्रस्त १० जखमींना त्वरित रुग्णालयात हलवण्यात आले असून, सुदैवाने त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, त्यांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.