हर्णे किनाऱ्यावर डिझेल तस्करीचा पर्दाफाश; दोन बोटी जप्त करत दोघांना अटक

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे किनारपट्टीवर सुरू असलेल्या डिझेल तस्करीच्या मोठ्या रॅकेटचा सीमाशुल्क विभागाने यशस्वी भंडाफोड केला आहे. या धडक कारवाईत ‘रत्न माऊली’सह अन्य एक बोट जप्त करण्यात आली असून, बोटीचा मालक आणि तांडेल अशा दोघांना अटक करण्यात आली आहे.
रंगेहात पकडली तस्करीची बोट हर्णे परिसरात एक मासेमारी बोट इतर बोटींना अवैधरित्या डिझेलची विक्री करत असल्याची गुप्त माहिती सीमाशुल्क विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे अधीक्षक अतुल व्ही. पोतदार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने २१ एप्रिल २०२६ रोजी रात्री समुद्रात शोधमोहीम राबवली. हर्णे किनाऱ्यापासून सुमारे ११ नॉटिकल मैलांवर ‘रत्न माऊली’ ही संशयित बोट २१ आणि २२ एप्रिलच्या मध्यरात्री डिझेल विक्री करताना रंगेहात पकडण्यात आली.

३०० टनांहून अधिक डिझेलची तस्करी कारवाईनंतर दोन्ही बोटी दाभोळ जेटीवर आणण्यात आल्या असून त्यांच्या कप्प्यांमध्ये साठवलेले डिझेल जप्त करण्यात आले आहे. प्राथमिक चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. ‘रत्न माऊली’ या बोटीद्वारे गेल्या दोन महिन्यांत सुमारे ३०० टनांहून अधिक डिझेलची तस्करी झाल्याचे उघड झाले आहे. या तस्करीच्या रॅकेटचे धागेदोरे कोठपर्यंत पसरले आहेत, याचा अधिक तपास आता यंत्रणा करत आहेत.

या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यासाठी विशेष सरकारी वकील शेखर डी. टोणपे यांनी न्यायालयात अर्ज सादर केला होता. दापोली येथील न्यायदंडाधिकाऱ्यांनी २४ एप्रिल रोजी हा अर्ज मंजूर करत दोघांना कोठडी सुनावली आहे.

समुद्रकिनारी किंवा परिसरात तस्करीसारख्या कोणत्याही संशयास्पद हालचाली आढळल्यास नागरिकांनी तातडीने संबंधित यंत्रणेला माहिती द्यावी, असे आवाहन सीमाशुल्क विभागाचे सहाय्यक आयुक्त संदीप कृष्णा यांनी केले आहे.