पुन्हा नव्याने संकट; मच्छीमार हवालदिल
रत्नागिरी:- एका मागून एक आलेली वादळे आणि वातावरणाची सतत बदलणारी परिस्थिती यामुळे मच्छीमार पुरते हैराण झाले आहेत. हंगाम सुरू झाल्यापासून एकामागोमाग एक संकटांचा सामना करणाऱ्या मच्छीमारांना पुन्हा वादळी परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. मागील दोन दिवसांपासून सुटलेले मतलयं वारे आणि मंगळवारी तयार झालेली पावसाळी स्थिती यामुळे मच्छीमारांपुढे पुन्हा संकट निर्माण झाले असून यावर्षी हंगामात कमी वेळात सर्वधिक वेळा मासेमारी व्यवसाय बंद ठेवण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
जुलै महिन्यात पारंपरिक आणि ऑगस्ट महिन्यात पर्ससीन मासेमारीचा हंगाम सुरू होऊनही व्यवसायाला अजूनही गती मिळालेली नाही. सततचे वादळी वारे आणि वादळांमुळे खवळलेला समुद्र यामुळे नाैका समुद्रात जाण्याचे प्रमाण कमी आहे. जुलै २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीनंतर वादळाची मालिका सुरुच आहे. वादळांसह अवकाळी कोसळणाऱ्या पावसाने तसेच मतलई वाऱ्यांमुळे मच्छिमारांचे प्रचंड नुकसान झाले आहे. निर्यातक्षम मासे मिळत नसून कमी प्रतीच्या माशांची मरतूक होत असल्याने मच्छिमारांना खलाशी, डिझेलचाही खर्च भागवता येत नाही.
या हंगामात चांगले मासे मिळतील अशा आशेवर असलेल्या मच्छिमारांना पुन्हा रिकाम्या हाताने किनाऱ्यावर थांबावे लागत आहे. चालू मासेमारी हंगामात वादळ, वाऱ्यांमुळे सुमारे १५ ते २० वेळा मासेमारी बंद ठेवावी लागली होती. कोरोना संक्रमणापासून मासेमारीत काही ना काही व्यत्यय येण्याचे प्रमाण वाढत असल्याने मच्छिमार संकटात सापडला आहे.
जिल्ह्यात ३,०७७ यांत्रिकी नौका आणि ४४२ बिगर यांत्रिकी नौका अशा एकूण ३,५१९ नौका आहेत. मागील ७ वर्षात माशांच्या उत्पादनात घट होऊन सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात ते निम्म्यावर म्हणजेच ६५,३७४ मेट्रीक टनावर आले होते. मात्र, चालू हंगामात सततच्या वादळ-वाऱ्यांमुळे आतापर्यंत माशांचे निम्मेही उत्पन्न मच्छिमारांना मिळालेले नाही.









