हातखंबा दर्गा येथील घटना
रत्नागिरी:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील हातखंबा दर्गा येथील धोकादायक चढणीवर शनिवारी (दि. १३) दुपारी सुमारे १२.४० वाजता भीषण अपघात घडला. डांबरमिश्रित गरम खडी घेऊन जाणारा भरधाव डंपर अचानक उलटून मागून येणाऱ्या स्विफ्ट कारवर कोसळल्याने सातारा येथील सहा प्रवासी गंभीर जखमी झाले. अपघाताची तीव्रता इतकी होती की डंपरमधील गरम खडी थेट कारवर पडून वाहन खडीने अक्षरशः रंगून गेले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, डंपर (क्र. एमएच -०८-एपी- ५६५२) दाभोळेकडून रत्नागिरीच्या दिशेने जात होता. हातखंबा-दर्गा येथील चढावात आल्यावर डंपरचा ताबा सुटून तो उलटला. त्याच वेळी सातारा-रत्नागिरी दिशेने येणारी स्विफ्ट कार (क्र. गरम डांबरमिश्रित खडी कारवर पडल्याने आत अडकलेल्या प्रवाशांना गंभीर दुखापती झाल्या. या अपघातात जखमी झालेले सर्व सहा प्रवासी सातारा जिल्ह्यातील असून त्यांना तातडीने रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये प्रज्ञा नितीन जाधव (२९), स्पृहा नितीन जाधव (६), वृंदा नितीन जाधव (४), नितीन जाधव (वाहनचालक), ऋषिकेश राजेंद्र शिंदे (२६) आणि ऋतुजा राजेंद्र शिंदे (२३) यांचा समावेश आहे. एमएच-११-एव्ही-९८२४) डंपरच्या खाली सापडली.
दरम्यान, डंपर चालक विपूल थावरा दामोर (मूळ रा. राजस्थान) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून रत्नागिरी ग्रामीण पोलिसांकडून घटनेचा सखोल तपास सुरू आहे. सदर डंपर ठेकेदार रवी इन्फ्रा कंपनीचा असल्याचे बोलले जात आहे. या भागात मुंबई- गोवा आणि मिऱ्या नागपूर महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपन्यांकडून ओव्हरलोड वाहतूक सुरू असल्याचे दिसून येत असते. ओव्हरलोड वाहतूक वारंवार होत असतानाही आरटीओ विभागाकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळेच अशा दुर्घटना घडत असल्याचा संताप वाहनचालकांकडून व्यक्त होत आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील वाढत्या अपघातांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून जबाबदार यंत्रणांनी तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.









