स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 13 ते 15 ऑगस्टला घरावर तिरंगा फडकवा

जिल्हा प्रशासनाकडून आवाहन

रत्नागिरी:- देशासाठी बलिदान दिलेल्याचे स्मरण व्हावे, यासाठी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 13 ते 15 ऑगस्ट या तीन दिवशी प्रत्येकांनी आपापल्या घरावर तिरंगा ध्वज डौलाने फडकवा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हाभरातील नागरिकांना केले आहे. त्याचबरोबर आजपासून ‘मेरी मिट्टी मेरा देश ’या उपक्रमाला सुरुवात झाली आहे.

15 ऑगस्ट 1947 या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळाले आहे. सध्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभरात मोठ्या दिमाखात साजरा केला जात आहे. गेल्या वर्षी देखील तीन दिवस सर्वच नागरिकांनी आपापल्या घरावर तिरंगा फडकवला होता. यंदा देखील 15 ऑगस्टलादेखील प्रत्येक घरावर तिरंगा ध्वज फडकविण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. प्रत्येक घरावर तिरंगा ध्वज फडकवला जावा, यासाठी प्रत्येक पोस्ट कार्यालयांत सशुल्क ध्वज उपलब्ध होणार आहे. तिरंगा ध्वजासाठी जिल्हा प्रशासनाकडूनही पुढाकार घेतला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे .

केंद्र सरकारने मेरी माटी, मेरा देश’ या नव्या उपक्रमाची घोषणा केली. मातीविषयी जनजागृती, प्रेम आणि साक्षरता निर्माण व्हावी, यासाठी 9 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट या कालावधीत अभियान राबविले जाणार आहे. गणेश मंडळांना बक्षीस आगामी गणेशोत्सवासाठी पर्यावरणपूरक मूर्ती, पर्यावरण सजावटचा वापर व्हावा, यासाठी राज्य सरकारने गणेश मंडळांसाठी स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेसाठी पाच लाखांचे पहिले, अडीच लाखांचे दुसरे तर एक लाखाचे तिसरे बक्षीस असणार आहे.
जिल्ह्यातील 846 ग्रामपंचायतींमध्ये ‘मेरी मिट्टी मेरा देश’ या उपक्रमाला आजपासून सुरुवात झाली आहे. 20 ऑगस्टपर्यंत हा उपक्रम चालणार आहे. गावातील अमृत सरोवर, शाळा, ग्रामपंचायती एका ठिकाणी शिलाफलकाची उभारणी करण्यात येणार आहे. वसुधा वंदन या उपक्रमामध्ये गावातील विविध ठिकाणी 75 देशी वृक्षांच्या रोपांची लागवड करून त्या ठिकाणी अमृतवाटिका करण्यात येणार आहे. ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील ज्यांनी देशासाठी, स्वातंत्र्यासाठी व सुरक्षेसाठी बलिदान दिलेल्या निवृत्त विरांचा, स्वातंत्र्यसैनिक यांच्या परिवारातील सदस्यांचा सन्मान करण्यात यावा. ग्रामपंचायत स्तरावर सर्व अधिकारी, कर्मचारी लोकप्रतिनिधी, ग्रामस्थांनी पंच प्रण शपथ घेण्यात यावी. गावक्षेत्रातील अमृत सरोवर, शाळा, ग्रामपंचायत आदी ठिकाणी ध्वजारोहण कार्यक्रम घेऊन राष्ट्रगीत गायनासह तिरंगा फडकवण्यात यावा. दि. 16 ते 20 ऑगस्टअखेर तालुकास्तरावर प्रत्येक गावातील आणलेली माती एका कलशामध्ये गोळा करावी. हा मातीचा कलश दि. 27 ते 30 ऑगस्ट या कालावधीत प्रधानमंत्री कार्यक्रमासाठी दिल्ली येथे घेऊन जाण्यास एका युवकांची निवड करावी. हा कार्यक्रम लोकसहभागातून केंद्र शासनाकडून राज्यस्तर, विभागस्तर, तालुकास्तर ग्रामस्तरावर विविध उपक्रम राबवण्याबाबत पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्‍यांना सूचना देण्यात आल्याची माहिती ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई यांनी दिली.