स्वातंत्र्याचा साक्षीदार आजही त्याच डौलाने उभा 

रत्नागिरी:-स्वातंत्र्यदिनी जे कल्पवृक्षाचे झाड हातीस ग्रामस्थांनी लावले ते आजही डौलाने उभे आहे. हे झाड लावण्यासाठी पुढाकार घेणारे आज स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव पाहायला हयात नाहीत. परंतु त्यांची स्मृती जपण्यासाठी अमृत महोत्सवानिमित्त गावात ७५ नारळ रोपे लावण्याचा उपक्रम ग्रामस्थांनी हाती घेतला आहे. 

स्वातंत्र्यदिनी ७५ वर्षांपूर्वी हातीसच्या भैरी-जुगाई मंदिराच्या आवारात नारळाचे रोप लावण्यात आले. २००६ पासून दरवर्षी हातीस ग्रामस्थ आणि शाळेतील मुले स्वातंत्र्यदिनी त्या कल्पवृक्षाचा वाढदिवस पारंपरिक आरती ओवाळून आणि आधुनिक पद्धतीने केक कापून साजरा करतात. अनेक वेळा हा कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा झाला आहे.परंतु कोरोनामुळे यंदा वाढदिवस मोठ्या स्वरूपात साजरा न करता ग्रामस्थांना ७५ नारळरोपांचे वितरण केले आहे. ही रोपे जगवण्याची ग्वाही ग्रामस्थांनी मान्यवर पाहुण्यांना दिली आहे.

त्या वेळी अगदी लहान असणारे आज वयोवृद्ध आहेत. त्यातीलच एक विजय नागवेकर यांनी सांगितले, आमच्या आधीच्या पिढीने स्वातंत्र्य मिळाल्याच्या दिवशीच बांबू उभा करून ध्वज फडकावला. त्यानंतर आनंदोत्सव साजरा झाला आणि नारळाचे झाड लावण्यात आले. त्याचा वाढदिवस गेली १५ वर्षे आम्ही साजरा करत आहोत. यंदा अमृत महोत्सवानिमित्त ७५ रोपे लावणार आहोत.

या आगळ्या उपक्रमात कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. श्रीरंग कद्रेकर, नारळ बोर्डाचे माजी अध्यक्ष राजाभाऊ लिमये, कुमार शेट्ये, कृषीविद्यावेत्ता भाट्ये (ता. रत्नागिरी) येथील प्रादेशिक नारळ संशोधन केंद्राचे माजी कृषि विद्यावेत्ता व ग्रामस्थ डॉ. दिलीप नागवेकर, कॅप्टन दिलीप भाटकर, सरपंच सौ. कांचन नागवेकर सहभागी झाले. तसेच हातीस ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. तुषार नागवेकर, विजय नागवेकर, उपाध्यक्ष दिवाकर नागवेकर, जयवंत नागवेकर, राजेंद्र नागवेकर यांच्यासमवेत ग्रामस्थ उपस्थित होते.