रत्नागिरी:- समाजामध्ये तेढ निर्माण होईल असा मजकूर सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी नदाफ काझी यावर कारवाई करण्याबाबत भाजपाने जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग यांची भेट घेतली. तत्काळ कारवाई करण्याची मागणी करतानाच समाजात अशा लिखाणामुळे तेढ निर्माण होईल, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल त्यामुळे पोलिसांनी तत्काळ पावले उचलावीत, अशी मागणी भाजपाच्या वतीने करण्यात आली. यासंदर्भातील निवेदन शहर पोलिस निरीक्षक विनीत चौधरी यांच्याकडेही देण्यात आले आहे.
रत्नागिरीतील रहिवासी असलेल्या नदाफ काझी या व्यक्तीने फेसबुकवर सामाजिक तेढ निर्माण होईल असा संदेश प्रसिद्ध केला. हा संदेश स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबाबत आक्षेपार्ह स्वरूपाचा होता. या सर्व प्रकारामुळे सावरकरप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. या प्रकाराची गंभीर दखल घ्यावी आणि संबंधित व्यक्तीवर योग्य ती करावाई तातडीने करावी, असे भाजपाने म्हटले आहे. तसेच मुंबईत टिपू सुलतानचे नाव मैदानाला देण्यावरून वाद सुरू आहे. याचा संदर्भ या पोस्टवरून दिसत आहे. सदर व्यक्ती एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे अशा आक्षेपार्ह लिखाणामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. सामाजिक भान विसरून अशा पोस्ट करणाऱ्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी भाजपाने केली आहे.
निवेदन देताना भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस सचिन वहाळकर, भाजयुमो जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांच्यासमवेत शहराध्यक्ष सचिन करमरकर, तालुकध्यक्ष मुन्ना चवंडे, नगरसेवक राजू तोडणकर, सरचिटणीस योगेश हळदवणेकर, संदीप सुर्वे, हर्षद घोसाळकर, सचिन साटम, सौ. पल्लवी पाटील, नगरसेविका सौ. मानसी करमरकर, सौ. संपदा तळेकर, नितीन जाधव, राजन फाळके, राजन पटवर्धन, यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.