स्वयंपाक करताना भाजल्याने संगमेश्वरच्या महिलेचा मृत्यू

देवरुख:- संगमेश्वर तालुक्यातील एका महिलेचा स्वयंपाकघरात चुलीवर जेवण बनवत असताना साडीच्या पदराला आग लागून भाजल्याने उपचारादरम्यान कोल्हापूर येथील रुग्णालयात मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना सुमारे पंधरा दिवसांपूर्वी घडली होती.

सौ. अक्षदा संतोष अंकुशराव (वय ४७ वर्षे, रा. लाखणवाडी, किरबेट, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) असे मृत महिलेचे नाव आहे. देवरुख पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास अक्षदा अंकुशराव या आपल्या राहत्या घरी चुलीवर स्वयंपाक करत होत्या. त्यावेळी चुलीतील अग्नीमुळे त्यांच्या साडीच्या पदराला अचानक आग लागली आणि त्या गंभीर जखमी झाल्या.

घटनेनंतर तातडीने त्यांना उपचाराकरिता प्रथम रत्नागिरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृतीची गंभीरता लक्षात घेऊन, अधिक उपचारांसाठी त्यांना दुसऱ्याच दिवशी, म्हणजेच २ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री ११.३५ वाजता कोल्हापूर येथील सी.पी.आर. हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. कोल्हापूर येथील रुग्णालयात त्यांच्यावर गेल्या पंधरा दिवसांपासून उपचार सुरू होते. मात्र, उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने १६ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

या घटनेची नोंद देवरुख पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ३२/२०२५ बी.एन.एस.एस १९४ प्रमाणे ‘वारस’ म्हणून २७ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री ९.४४ वाजता करण्यात आली आहे. स्वयंपाकघरात झालेल्या या अपघातामुळे अंकुशराव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलीस या प्रकरणाची पुढील तपासणी करत आहेत.