स्वच्छतेचा ब्रँड ॲम्बेसेडर ओंकार भोजने

चिपळूण नगर परिषदेचा अभिनेत्याला बहुमान

चिपळूण:- “स्वच्छ भारत मिशन – शहरी” अंतर्गत चिपळूण नगर परिषदेने एक महत्त्वाचा निर्णय घेत सामाजिक भान जपणाऱ्या आणि अभिनय क्षेत्रात स्वतःची छाप पाडलेल्या अभिनेते ओंकार भोजने यांची स्वच्छता दूत / ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे.

नगर परिषदेच्या वतीने प्रशासक तथा मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी नियुक्तीपत्र देताना सांगितले की, “चिपळूण शहरात स्वच्छता विषयक जनजागृती करण्यासाठी सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रातील प्रभावी व्यक्तींचा सहभाग अत्यावश्यक आहे. ओंकार भोजने हे युवकांचे प्रेरणास्थान असून त्यांच्या प्रतिमेमुळे स्वच्छता मोहिमेला नवी दिशा व ऊर्जा मिळेल.”

अभिनेते भोजने यांनीही या नियुक्तीचा स्वाभिमानाने स्वीकार करत सांगितले की, “स्वच्छता ही केवळ सरकारची जबाबदारी नसून आपण सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. चिपळूणकरांसोबत हा उपक्रम अधिक प्रभावी करण्यासाठी मी पूर्ण योगदान देईन.”

शहरात लवकरच स्वच्छतेसाठी विविध जनजागृती उपक्रम राबवण्यात येणार असून त्यात ओंकार भोजने सक्रिय सहभाग घेणार आहेत. त्यांच्या उपस्थितीमुळे मोहिमेला अधिक गती मिळण्याची अपेक्षा आहे.