रत्नागिरी:- प्रत्येक तालुक्यातील एक आणि जिल्हास्तरावरील एक याप्रमाणे 2018-19 आणि 2019-20 या आर्थिक वर्षातील स्मार्ट ठरलेल्या गावांची माजी गृहमंत्री आर. आर. पाटील (आबा) सुंदर गाव पुरस्कारासाठी निवड केली आहे. तालुकास्तरावर गावाला दहा लाख आणि जिल्हास्तरावर 40 लाख रुपये रोख देण्यात येणार आहे. या पुरस्काराचे वितरण 16 फेब्रुवारीला होणार असून सुमारे सव्वा पाच कोटीची रोख पारितोषीकांच वाटप केले जाईल.
स्वच्छ, सुंदर गावांसह आधुनिकीकरणाचे महत्त्व वाढावे यासाठी राज्य शासनाने स्मार्ट ग्राम संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत माजी गृहमंत्री आर. आर. उर्फ आबा पाटील यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जाणार आहे. 16 ला त्यांची पुण्यतिथी असून त्या दिवशी या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील अठरा गावांची सुंदर गाव पुरस्कारासाठी निवड झाली आहे. तालुक्यातून प्रथम आलेल्या एका गावाला दहा लाखाचे पारितोषीक असून जिल्हास्तरावर प्रथम क्रमांकाला चाळीस लाखाचे पारितोषीक आहे. जिल्हा परिषद ग्रामपंचायत विकास विभागाकडून पुरस्कार पात्र गावे निवडली आहेत.
पुरस्कारप्राप्त गावांमध्ये वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतागृह, पाणी गुणवत्ता, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, पायाभुत सुविधांचे व्यवस्थापन, आरोग्य शिक्षण सुविधा, शासनाच्या योजनांचे नियोजन, बचत गट चळवळीची स्थिती, घरपट्टी व पाणीपट्टी वसुली, ग्रामसभांचे आयोजन, अपारंपरिक उर्जास्त्रोतांचा वापर, ग्रामपंचायतीत ऑनलाईन सुविधांचा वापर यावर ग्रामपंचायती पुरस्कारासाठी निवडण्यात आल्या आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातून निवडलेल्या ग्रामपंचायतींचा सन्मान 16 ला दुपारी 4 वाजता पालकमंत्री अॅड. अनिल परब, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत, जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, सर्व आमदार, जि. प. पदाधिकारी, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांच्या उपस्थित होणार आहे.