स्फोटक सापडल्याच्या अफवेने रत्नागिरीत खळबळ

जिल्ह्यात पोलिसांचे “ऑपरेशन रत्नदुर्ग” (डमी डिकॉय)

रत्नागिरी:- मुंबईवर झालेल्या २६/११ च्या हल्याच्या पार्श्वभूमीवर ३१ डिसेंबर पर्यंत राज्यात पोलीस यंत्रणेला विशेष अलर्ट करण्यात आले असून समुद्रमार्गे अतिरेकी किनारपट्टी भागात घुसण्याची शक्यता डोळ्यासमोर ठेवून रत्नागिरीत ‘ऑपरेशन रत्नदुर्ग’ (डमी डिकॉय) राबविण्यात आले.

सन १९९३ मध्ये झालेला बॉम्बस्फोट व २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अतिरेक्यांनी सागरी मार्गाचा वापर केला होता. त्यानंतर  सागरी सुरक्षोला आत्यंतिक महत्व देऊन सागरी सुरक्षा मजबूत करण्यात आली. सागरी सुरक्षेसाठी शासनाकडून विविध उपाययोजना सुरु करण्यात आल्या. यापैकी समुद्र किनारा असलेल्या गावामध्ये विशेष रस्त्यावर पोलीस चेकपोस्ट उभारण्यात आले. मुंबईला लागुनच कोकण किनारपट्टी असल्याने ३१ डिसेंबर च्या पार्श्वभूमीवर दहशतवादी घुसखोरी करुन हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व सुरक्षा यंत्रणेची सतर्कता तपासण्यासाठी  शनिवारी  संपुर्ण जिल्ह्यात ‘ऑपरेशन रत्नदुर्ग’ (डमी डिकॉय) मोहीम राबविण्यात आली. ‘ऑपरेशन रत्नदुर्ग’ करीता रेड फोर्स (शत्रु पक्ष) व ब्ल्यु फोर्स अशी दोन पथके तयार करण्यात आलेली होती. रेड फोर्सकडून जिल्ह्यातील प्रार्थनास्थळ, गर्दीचे ठिकाणे, चेकपोस्ट इत्यादी ठिकाणे टारगेट करण्यात आले होते. मोहीमेकरीता रेड फोर्स २ वाहने, ६ बनावट दहशतवादी यांचा वापर करण्यात आला .

यावेळी डमी दहशतवादी बनावट स्फोटक पदार्थ वाहनातुन घेऊन जात असल्याची माहिती मिळाली. यावेळी कारवाईचा डेमो पार पडला. ब्ल्यु फोर्स म्हणुन जिल्ह्यातील प्रार्थनास्थळे, गर्दीची ठिकाणे, चेकपोस्ट इत्यादी ठिकाणी ३५ पोलीस अधिकारी व २३२ पोलीस अंमलदार, ७० होमगार्ड, २७ सुरक्षा वॉर्डन इत्यादी पोलीस बंदोबस्त नेमण्यात आलेला होता. रत्नागिरी शहर पोलीस ठाणे हद्दीतील भाट्ये चेकपोस्ट येथे रेड फोर्समधील बनावट दहशतावाद्यांनी बनावट स्फोटक पदार्थ वाहतुक करण्याचा प्रयत्न केला परंतु तेथील सुरक्षा यंत्रणा सतर्क असल्यामुळे बनावट दहशतवादी यांना वाहनासह पकडण्यात आले.

त्यांचेकडे संशयीत वस्तु आढळून आल्याने तात्काळ पोलीस नियंत्रण कक्ष येथे कळवुन राखीव फोर्स, बॉम्ब शोधक व नाशक पथक, अग्नीशामक दल यांना पाचारण करण्यात आले व दोन्ही बाजुची वाहतुक थांबविण्यात आली. बॉम्ब शोधक व नाशक पथकाकडून संशयीत वस्तुंची तपासणी करण्यात आली. त्यात आक्षेपार्ह / संशयीत काही आढळून आलेले नाही. त्यानंतर चेकपोस्टवरील वाहतुक सुरळीत करण्यात आली. याचप्रकारे गुहागर पोलीस ठाणे हद्दीतील आबलोली चेकपोस्ट व जयगड पोलीस ठाणे हद्दीतील खंडाळा येथे सुरक्षा यंत्रणेची सतर्कता तपासण्यात आली. तेथील सुरक्षा यंत्रणा सतर्क असल्यामुळे रेड फोर्सला यशस्वी होता आले नाही. अशाप्रकारे ‘ऑपरेशन रत्नदुर्ग’ ( डमी डिकॉय ) मोहीम यशस्वीरित्या पार पडलेली आहे. मोहीमेचे नोडल अधिकारी म्हणुन सहा. पोलीस निरीक्षक जयदिप कळेकर यांनी पाहीले.