स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी जि. प. घेणार ‘टॅलेंट सर्च परीक्षा’

रत्नागिरी:- ग्रामीण भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील मुलांना स्पर्धा परिक्षांना सामोरे जाण्याची मानसिकता बनविण्यासाठी आणि नियमित अभ्यासक्रमांची तयारी करण्याच्या उद्देशाने शिक्षण विभाग रत्नागिरी टॅलेंट सर्च परिक्षा घेत आहे. पहिली ते चौथी आणि पाचवी ते सातवी अशा दोन गटात परिक्षा होणार असून २५१ केंद्रातील २० हजार ८३१ विद्यार्थी बसणार आहेत. २८ फेब्रुवारीला ही परिक्षा घेण्यात येणार आहे.

नासा, इस्त्रो भेटीसाठी रत्नागिरी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांसाठी परिक्षा घेतली होती. त्यामधून निवडलेल्या २७ विद्यार्थ्यांना इस्त्रो भेटीसाठी नेण्यात आले होते. हा प्रयोग यशस्वी झाला आहे. आता रत्नागिरी टॅलेंट सर्च हा उपक्रम राबविण्यास सुरवात केली आहे. याला तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी पाठबळ दिले होते. विद्यमान सीईओ किर्तीकिरण पुजार यांनीही परिक्षांचा आढावा घेत अंमलबजावणीच्या सुचना दिल्या होत्या. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा स्तर उंचावणे हा आहे. कोरोना कालावधीत अनेक विद्यार्थ्यांना अभ्यास करता आलेला नव्हता. त्या अभ्यासाची उजळणी व्हावी यासाठी शासनाने शिक्षण विभागाला सुचना दिलेल्या होत्या. त्याच धर्तीवर पहिली ते चौथीच्या आणि पाचवी ते सातवीच्या अभ्यासक्रमावर आधारीत चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी रत्नागिरी टॅलेंट सर्च परिक्षा घेण्याचा निर्णय झाला. या निमित्ताने अभ्यासाची उजळणी आणि परिक्षांची सवय मुलांना होणार आहे. परिक्षेचा पेपर ७५ गुणांचा असून यामध्ये मराठी, इंग्रजी, हिंदी व उर्दु व्याकरण, गणित, इतिहास, भुगोल, विज्ञान यावर आधारी प्रश्‍न विचारण्यात येणार आहेत. हा उपक्रम तळागाळात राबविण्याची जबाबदारी उपशिक्षणाकारी एस. जे. मुरकुटे यांच्याकडे दिलेली आहे. ही परिक्षा २५१ केंद्रांवर होणार असून चौथीचे १२ हजार ५६१ आणि पाचवीचे ८ हजार २७० विद्यार्थी बसणार आहेत. यामधील अव्वल गुण मिळवणार्‍यांना सुवर्ण, रौप्य व कांस्य पदक देऊन सन्मानित केले जाईल. केंद्र, बीट व तालुकास्तरावर प्रत्येकी तिन विद्यार्थ्यांसाठी निवड केली जाणार आहे.