रत्नागिरी:- जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची प्रारूप प्रभाग रचनेत अनेक गट आणि गणात मोठ्या प्रमाणात फेरबदल करण्यात आले आहेत. त्यामुळे मिनी मंत्रालयात जाण्यासाठी तयारी केलेल्या अनेक इच्छुकांना मोठा धक्का बसला आहे. यामुळे आता गट व गणामध्ये मोठे फेरबदल झाल्याने इच्छुकांना पुन्हा नव्याने तयारी करावी लागणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या प्रारूप प्रभाग रचनेच्या कार्यक्रमानुसार गट व गणांचा प्रारूप प्रभाग रचनांचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकार्यांनी विभागीय आयुक्ताकडे सादर केला होता. या प्रस्तावावर आयुक्त स्तरावर भौगोलिक स्तर, लोकसंख्या पाहन 31 मेपर्यंत गट व गणांना मान्यता दिली होती. त्यानंतर विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी यांनी 2 जून रोजी प्रारूप प्रभाग रचनेची अधिसूचना प्रसिद्ध केली. जिल्हा परिषदेमधील गटांची संख्या 55 वरून 56 वर, तर पंचायत समिती गणांची संख्या 110 वरून 124 वर पोहोचली आहे. पूर्वीच्या गट व गणांतील काही गावांचा दुसर्या गट व गणांत समावेश झाला आहे. तसेच काही गट व गणांची नावेही बदलली आहेत. वाढीव गटांमध्ये व त्याअंतर्गत झालेल्या गणांमध्ये आता राजकीय घडामोडींना नव्याने वेग येणार आहे. इच्छुकांनी आता नव्याने जोरबैठका काढण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे आता वाढीव गट व गणांसह सर्वच गट व गणांमध्ये बरीच राजकीय कालवाकालव सुरू झाली असून पदाधिकार्यांमध्ये ’कहीं खुशी, कहीं गम’ असे चित्र निर्माण झाले आहे.
दरम्यान, या प्रभाग रचनेवर आक्षेप, हरकती व सूचना 8 जूनपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल करता येणार आहेत. यावर 22 जूनपर्यंत सुनावणी होणार असून, त्यानंतर अंतिम प्रभाग रचना 27 जून रोजी जाहीर केली जाणार आहे.
राजकारणात येणार्या इच्छुकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राजकारणात प्रवेश करण्यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती हा एक चांगला मार्ग मानला जातो. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यात अनेकांनी जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीत जायचेच यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे.
जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीच्या गणाची प्रभाग रचना तयार करताना मोठी फोडाफोडी झाली आहे. नव्या मतदारसंघात गावेच बदलली गेल्याने अनेक मातब्बरांना धक्का बसला आहे. काही जणांनी जुन्या मतदारसंघात तयारी केली होती, त्यांचे मनसुबे धुळीला मिळाले आहेत. तब्बल 25 हून अधिक मतदारसंघाची फोडाफोडी झाल्याचे दिसून येत
आहे. प्रभाग रचनेनंतर आता आरक्षणाकडे लक्ष जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची जाहीर केलेली प्रारूप प्रभाग रचना बहुतेक कायम होणार आहे. आता आरक्षण सोडतीकडे इच्छुकांचे लक्ष आहे. महिलांना पन्नास टक्के जागा राखीव आहेत. त्यामुळे महिला राखीव झाल्यास पत्नीला किंवा राखीव जागेवर आरक्षण पडल्यास जवळच्या कार्यकर्त्याला उभे करून निवडून आणायचे, असा प्रयत्न अनेक इच्छुकांचा आहे. आरक्षण सोडतीनंतर निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.