स्थानिक स्तरावर उभी राहणार क्वारंटाईन सेंटर 

कोविड रुग्णालयावरील भार होणार कमी

रत्नागिरी:- कमी मनुष्यबळामुळे जिल्हा कोविड रुग्णालयाबाबत अनेकांमध्ये गैरसमज, भीती आहे. त्यामुळे उपचारासाठी दाखल होण्यास रुग्णांकडून विरोध होऊन वारंवार वाद निर्माण होत आहेत. आता मात्र हे प्रकार थांबवण्यास मदत होणार आहे. कारण रत्नागिरीतील राजिवडा, कर्ला, मिरकरवाडा, साखरतर, शिरगाव आदी भागांत स्थानिकांच्या पुढाकाराने क्वारंटाईन सेंटर उभारण्यात येत आहेत.

प्रांताधिकार्‍यांच्या परवानगीने ही सेंटर उभारली जात असून राजिवड्यातील 20 खाटांच्या सेंटरचा नुकताच आरंभ झाला. यामुळे आरोग्य विभागाचा ताण काहीसा कमी होणार असून या नागरिकांनी समाजापुढे वेगळा आदर्श ठेवला आहे. जिल्हा कोविड रुग्णालयात डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय आदी कर्मचारी जीवाची बाजी लावून कोरोना योद्धा म्हणून काम करत आहेत. हे युद्ध लढता-लढता कोरोना योद्धाच बाधित झाले आहेत. रुग्णालयातील मनुष्यबळ कमी होत चालल्याने सेवेवर परिणाम झाला आहे; मात्र तरी उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न आरोग्य यंत्रणेचा आहे. जिल्हा कोविड सेंटरमध्ये योग्य उपचार, सेवा मिळत नाही. काही इंजेक्शनाबाबत गैरसमज आहे. त्यामुळे कोरोना बाधित जिल्हा कोविड रुग्णालयात दाखल होण्यास धजावत नव्हते. यातून वाद उफाळले आहेत.

विशेषतः मुस्लिम समाजातील रुग्णांबाबत हे प्रकार घडल्यामुळे या समाजातील स्थानिक प्रतिष्ठितांनी पुढाकार घेतला. त्या-त्या भागातच कोविड सेंटर उभारण्याची तयारी दर्शविली. त्या समाजातील किंवा विश्‍वास असलेले डॉक्टर त्यासाठी 2-2 तास देणार आहेत. त्यानुसार राजिवडा येथे 20 बेडच्या कोविड सेंटरचा काल उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या हस्ते आरंभ झाला.