रत्नागिरी:- रत्नागिरी शहर व्यापारी महासंघ आयोजित भव्य बक्षीस योजनेचा बक्षीस समारंभ काल दिमाखदार पद्धतीने शहरातील जयेश मंगल कार्यालयात पार पडला. या बक्षीस योजनेच्या अंतिम सोडतीत अमोल कळंबटेला वॅगनआर कार, रजनी लाडे टिळक आली यांना होंडा ॲक्टिव्हा बक्षीस म्हणून देण्यात आली. सुमारे १० लाखांच्या बक्षिसाचे वितरण या दिमाखदार सोहळ्यात करण्यात आले.
या कार्यक्रमाला उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, कॉंग्रेसचे जेष्ठ नेते आणि उद्योजक रमेश कीर, राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य बशीर मुर्तुझा, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबू म्हाप, शहर पोलीस निरीक्षक विनीत चौधरी, वाहतूक पोलीस निरीक्षक शिरीष सासने, सोलापूर वाईन असोसिएशन अध्यक्ष वैभव पाटील, चिपळूण व्यापारी महासंघाचे अध्यक्ष शिरीष काटकर, लांजा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रसन्न शेट्ये, बीजेपी महिला आघाडीच्या प्राजक्ता रुमडे आदी मान्यवर उपस्थित होते.
दिमाखदार आणि शिस्तबद्ध सोहळा
दसरा-दिवाळी-नाताळ या कालावधीसाठी रत्नागिरी शहर व्यापारी महासंघाने भव्य बक्षीस योजनेचे आयोजन केले होते. या कालवधीत ग्राहकांनी योजनेत सहभागी झालेल्या दुकानातून केलेल्या खरेदीवर एक कुपन देण्यात येत होते. या योजनेत सुमारे १५ लाखांची बक्षिसे जाहीर करण्यात आली होती. या योजनेतील सर्वात महत्वाचे आकर्षण असणारी वॅगनआर कार मारुती मंदिर येथून ढोल ताशांच्या गजरात वाजतगाजत कार्यक्रमस्थळी आणण्यात आली आणि यानंतर बक्षीस समारंभाच्या दिमाखदार सोहळ्याला सुरुवात झाली. रत्नागिरी शहर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष गणेश भिंगार्डे आणि तालुकाध्यक्ष निखील देसाई यांच्या मार्गदर्शनखाली व्यापारी महासंघाने अतिशय उत्कृष्ठ पद्धतीने व शिस्तबद्ध रीतीने या कार्यक्रमाचे नियोजन केले.
प्रत्येक भाग्यवान ग्राहकाला मिळाले बक्षीस
महा बक्षीस योजनेच्या या अंतिम सोहळ्यासाठी ५२ भाग्यवान ग्राहकांची निवड करण्यात आली होती व त्यांना या कार्यक्रमाला निमंत्रित करण्यात आले होते. या उपस्थित भाग्यवान ग्राहकांपैकी प्रत्येकाला अक्शीस मिळणार होते मात्र वॅगनआर कारकुणाला लागणार याकडे साऱ्यांचे लक्ष होते. एक एक करीत मान्यवरांच्या हस्ते कुपन काढण्यात येत होती. अखेर सर्वांचे लक्ष लागून राहिलेला तो निकाल लागला व अमोल कळंबटे यांना वॅगनआर कार, रजनी लाड, टिळक आळी यांना होंडा अॅक्टिव्हा व कर्णिका सावंत यांना वॉशिंग मशीन हे बक्षीस मिळाले. निवड झालेल्या इतर भाग्यवान ग्राहकांना एल ई डी टीव्ही, गॅस स्टोव्ह, ओव्हन, कुकर हि बक्षिसे देण्यात आली
कोरोना काळात महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांमध्ये सर्वात आदर्शवत काम रत्नागिरीतील व्यापाऱ्यांनी केलंय : ना. सामंत
बक्षीस समारंभाच्या या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत उपस्थित होते. आपल्या नेहमीच्या तडाखेबाज शैलीत त्यांनी या कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त केले. व्यापारी महासंघाच्या उपक्रमाबाबत गौरोद्गार काढता ते म्हणाले कि संपूर्ण महराष्ट्रात कोरोना काळात व्यापाऱ्यांमध्ये सर्वात आदर्शवत काम रत्नागिरीतील व्यापाऱ्यांनी केलंय. आपल्या गरजेला उपयोगी पडणारा आपला जवळचाच माणूस असतो त्यामुळे ग्राहकांनी देखील खरेदी करताना हि महत्वाची बाब ध्यानात ठेवली पाहिजे. बाहेरून येणाऱ्याना स्थिरस्थावर करण्यापेक्षा स्थानिक व्यापाऱ्यांना पाठबळ देऊया असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केले.









