रत्नागिरी:-शहरातील छत्रपती शिवाजी क्रीडांगणामधील 11 गाळे आज पालिकेने पंचनामा करून ताब्यात घेतले. गाळेधारकांनी पालिकेने बजावलेल्या नोटिसीवरून पुन्हा न्यायालयात गेले होते. मात्र त्यांची बाजू कमकुवत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी माघार घेत दोन दिवस स्वतःहून गाळे रिकामे केले. पालिकेने सर्व गाळे आज ताब्यात घेतले. पुढील प्रक्रिया करून लवकरच ते नवीन गाळेधारकांना दिले जाणार आहे. त्यामुळे पालिकेच्या उत्पन्नात भर पडणार आहे.
मुदतवाढीसाठी 11 गाळेधारकांचा काही वर्ष सुरू असलेला पालिकेबरोबरचा संघर्ष आता संपुष्टात आला आहे. पालिकेच्या मालकीच्या 11 गाळ्यांची मुदत संपूनही कोणतीही मुदतवाढ न घेता गाळेधारकांनी ताब्यात ठेवल्याचे नगरसेवक निमेश नायर यांनी सभागृहाच्या लक्षात आणून दिले होते. तेव्हा ते ताब्यात घेण्याबाबत पालिकेने कारवाई सुरू केली. मात्र मुदतवाढ न मिळालेल्या गाळेधारकांनी पालिकेच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली तसेच नगरविकास मंत्रालयाकडे मुदतवाढीसाठी याचना केली. उच्च न्यायालयाने पालिकेची बाजू मान्य करीत निर्णय घेऊन दोन महिन्यात प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले.
पालिकेने निविदा प्रक्रिया सुरू केली. ही निविदा प्रक्रिया स्थगित करण्यासाठी गाळेधारकांनी रत्नागिरीतील दिवाणी न्यायालयात केलेला अर्ज फेटाळल्यामुळे पालिकेने गाळे ताब्यात घेण्याचा निर्णय झाला. त्यानुसार मालमत्ता विभागाचे पथक काही दिवसांपूर्वी गाळे सील करण्यासाठी गेले होते. मात्र गाळेधारकांनी कारवाई हाणून पाडली. त्यानंतर पालिकेने गाळे खाली करण्याची नोटीस देत 3 दिवसाची मुदत गाळेधारकांना दिली. त्याविरोधातही ते न्यायालयात गेले. मात्र तेथे आपल्याविरोधात निकाल जाणार याचा अंदाज आल्याने गाळेधारकांनी स्वतःहून गाळे रिकामे केले. मालमत्ता विभागाने अकराही गाळ्यांचा पंचनामा करून ते सील केले. आता लवकरच पुढील प्रक्रिया केली जाणार आहे.