सैतवडे येथे आगीत घर जळून खाक; मोठे नुकसान

रत्नागिरी:- तालुक्यातील सैतवडे येथील बोरसई मोहल्ला येथील मुद्दस्सर खलपे यांच्या घराला शनिवारी रात्री आग लागली. बघता बघता आगीने रौद्र रूप धारण केले. संपूर्ण घर आगीच्या विळख्यात सापडले. आग कशाने लागली याचे कारण समजू शकले नसले तरी या आगीत मोठे नुकसान झाले आहे. 
 

शनिवारी रात्री ही दुर्घटना घडली. अचानक लागलेल्या आगीत मनुष्यहानी झाली नसली तरी खलपे कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. 

सैतवडे बोरसई मोहल्ला येथे मुद्दसर खलपे यांच्या घराला लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी जयगड येथील पोर्ट,एनर्जी,चोघुले कंपनी येथील अग्निशमन दल,जयगड खंडाळा पोलीस,सैतवडे सरपंच सागर कदम,गुंबद सरपंच उषा सावंत,मुनाफशेठ वागळे,अजिम चिकटे,साजिद शेकासन,अनिकेत सुर्वे,बानू खलपे,राजेश पालशेतकर,बोरसई ग्रा.पं. सर्व सदस्यअसे  गावातील सर्व तरुण कार्यकर्ते आग विझवण्याचे आटोकाट प्रयत्न करीत होते.

या ठिकाणी बंब बोलावून आग आटोक्यात येईपर्यंत स्वतः जि.प.सदस्या सौ.ऋतुजा जाधव उपस्थित होत्या.त्यांनी ही घटना ज्येष्ठ उद्योजक मा.अण्णा सामंत व रत्नागिरी तहसीलदार मा.जाधव यांचे बरोबर रात्रीच फोनवर चर्चा करून परिस्थितीचे गांभीर्य सांगितले व ज्यास्तीत ज्यास्त मदतीची मागणी केली आहे.ही घटना खूपच दुर्दैवी होती. या दुर्घटनेत लाखोंचे नुकसान झाले आहे.