रत्नागिरी:- शहरातील भगवती बंदर ब्रेक वॉटर वॉल येथे समुद्रात सेल्फी काढणाऱ्या तरुणाचा लाटे सोबत वाहून गेल्याने मृत्यू झाला. रविवार १ ऑक्टोबर रोजी ही घटना घडली. बुडालेल्या तरुणाचा मृतदेह स्थानिक तरुणांनी बाहेर काढला.
अल्लाउद्दीन नसिरुद्दीन मोंडल (वय १९, मूळ रा. पश्चिम बंगाल, सध्या रा. मिरकरवाडा, रत्नागिरी) असे बुडून मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. तो हार्बर अटलांटिक फिश एक्स्पोर्ट या कंपनीत कामाला होता. रविवार, १ ऑक्टोबर रोजी कंपनीला सुट्टी असल्याने तो मित्रासोबत भगवती बंदर येथील ब्रेक वॉटर वॉल येथे गेला होता. तिथे फिरत असताना समुद्राच्या पाण्याजवळ गेला असताना सेल्फिचा मोह अनावर झाला आणि समुद्राच्या लाटेने तो समुद्रात ओढला जाऊन वाहून जाऊ लागला. याबाबत त्याचा मित्र राकीबुल इस्लाम साहेब अली मोल्ला याने खबर देणाऱ्यांस फोन करुन अल्लाउद्दीन मोंडल पाण्यात वाहून जात असल्याचे सांगितले. खबर देणार हे आपल्या कंपनीतील इतर कामगारांसह घटनास्थळी गेल्यावर त्यांनी अल्लाउद्दीनला समुद्राच्या पाण्यातून बाहेर काढून रुग्णवाहिकेतून जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मोंडलला तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.









