रत्नागिरी:- सेन्ट्रींगचे काम करत असताना डोक्यावर पडून जखमी झालेल्या प्रौढाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे हलविण्यात आले होते. उपचारानंतर घरात आराम करत असताना बेशुद्ध अवस्थेत आढळल्याने त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले उपचारापुर्वीच त्याचा मृत्यू झाला. राम महादेव अधिकारी (वय ५८, रा. गाव तालपुकूर पारा रेल, ता. राणाघाट, जि. नदियो राज्य वेस्ट बंगाल) असे मृत कामगाराचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. १५) रात्री साडेआठच्या सुमारास खासगी रुग्णालयात घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार राम अधिकारी हा सेट्रींग इंजिनिअर वर्क या कंपनीत काम करत होता. २५ नोव्हेंबरला साईटवर काम सुरु असताना सिमेंट जमिनीवर टाकताना ते डोक्यावर पडले होते. त्यांना उपचारासाठी सिव्हील आणि त्यानंतर कोल्हापूर येथे उपचार सुरु होते. तिथून घरी आराम करत असताना सोमवारी बेशुद्ध अवस्थेत आढळले. तात्काळ नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारापूर्वीच तपासून मयत घोषित केले. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.









