सेतू कार्यालयाबाहेर दलालांचा सुळसुळाट; साक्षीला १५० तर अर्ज भरण्यास ५० रुपये

रत्नागिरी:- जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असलेल्या सेतू कार्यालयाबाहेर बसणाऱ्या एजंटांनी गोरगरिबांची आर्थिक लूट सुरू केल्याच्या तक्रारी आहेत. आवश्यक अर्ज लिहून देण्यासाठी ५० रु., साक्षीदार म्हणून सही करण्यासाठी १५० रु. तर दाखले मिळवून देण्यासाठी अथवा त्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तोंडाला येईल ती रक्कम उकळण्याचा सपाटा या एजंटनी लावल्याची चर्चा आहे.प्रशासनाने याबाबत माहिती घेऊन कारवाई करण्याची ग्वाही दिली आहे.

ग्रामीण भागातून अनेक नागरिक विविध दाखल्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात येतात. येथे असणाऱ्या सेतूच्या माध्यमातून हे दाखले नागरिकांना वितरित केले जातात; मात्र ग्रामीण भागातून येणाऱ्या गरीब आणि अशिक्षित नागरिकांना लुटण्याचा धंदा काही एजंट म्हणवणाऱ्यानी उघडल्याचे दिसत आहे. याच सेतूच्या बाहेर काही स्टँप व्हेंडरदेखील टेबल टाकून आहेत. आम्ही अधिकृत असून प्रशासनाने आम्हाला येथे बसण्याची रितसर परवानगी दिल्याचे हे व्हेंडर सांगतात. याच व्हेंडरनी आपल्या हाताखाली चार चार कर्मचारी ठेवून त्यांना याच ठिकाणी आणखी टेबल टाकून दिले आहेत. या ठिकाणीही विविध अर्ज लिहून देण्याचे काम केले जाते. गावातून आलेली गरीब जनता गोंधळलेली असते. आवश्यक दाखले मिळवण्यासाठी हे एजंट सांगतील ती रक्कम शेवटी द्यावी लागते. मुळात दाखल्यांसाठी आवश्यक अर्ज भरून देण्याचे काम सेतू कार्यालयात अवघ्या १० रुपयात केले जाते; मात्र याबाबत कोणतीही सूचना लिहिलेला बोर्ड या ठिकाणी दिसत नाही. त्यामुळे गोंधळलेले नागरिक बाहेर येऊन चौकशी करतात आणि याचवेळी ते एजंटांच्या जाळ्यात फसतात. यावर प्रशासनाने कारवाई करून या एजंटगिरीला आळा घालावा, अशी मागणी होत आहे.