बागायतदारांची मागणी; संशोधनावर आधारीत सल्ले द्या
रत्नागिरी:- सेंद्रीयच्या नावाखाली खत विक्री करणार्या अनेक कंपन्या दरवर्षी जिल्ह्यात येतात. त्यातील घटक हे बागायतीला किती फायदेशीर असू शकतात हे सांगता येत नाही. यासाठी अशी खते कोकण कृषी विद्यापिठाची शिफारस असल्याशिवाय विक्रीला आणू नयेत, असे धोरण निश्चित केले जावा अशी मागणी बागायतदारांनी फलोत्पादन संचालक डॉ. कैलास मोते यांच्याकडे केली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत सभागृहात आयोजित चर्चासत्रात बागायतदारांनी डॉ. मोते यांच्याशी संवाद साधला. यावेळी हेमंत तांबे, विनोद प्रभुदेसाई, राजन लेले यांच्यासह अनेक बागायतदार उपस्थित होते. डॉ. मोते यांनी बागायतदार व रोपवाटीकाधारकांच्या समस्या ऐकुन घेत त्यावर तात्काळ उपाययोजना करण्याच्या सुचना दिल्या आहेत. मे, जून महिन्यात अनेक खत कंपन्या रत्नागिरीत येतात. त्यांच्याकडून सेंद्रीयच्या नावाखाली थेट बागायतदारांच्या शेतात खत उतरवले जाते. काहीजणांच्या पिशव्यांवरच त्यातील समाविष्ट घटकांची माहितीही असते; परंतु कोकण कृषी विद्यापिठ किंवा तत्सम अधिकृत यंत्रणेच्या शिफारशीचा काहीच मागमुस नसतो. कचर्यापासून खत निर्मिती करुन ते आंबा, काजू बागायतदारांना विकले जाते. त्यामध्ये बोगस खताचाही समावेश नाकारता येत नाही. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कृषी विभागाकडून पावले उचलली गेली पाहीजेत अशी सुचना यावेळी करण्यात आली. काजू लागवडीसंदर्भात कोकण कृषी विद्यापिठाकडून योग्य ते मार्गदर्शन होत नाही. शेतकर्याच्या बागेमध्ये जाऊन केलेल्या संशोधनावर आधारीत
उदाहरणे जाहीर करणे आवश्यक आहे. सल्ले देत असताना संबंधित संशोधन झालेले प्रात्यक्षिक दाखवल्यास शेतकर्याचा त्यावर जास्त विश्वास बसू शकतो अशा प्रतिक्रिया यावेळी बागायतदारांनी व्यक्त केल्या.
भाऊसाहेब फुंडकर योजनेतून फळ बाग लागवडीला चालना मिळत होती. ती योजना पुन्हा सुरु करणे आवश्यक आहे. त्याचा शेतकर्यांना चांगला लाभ होतो. कमी जागा असलेल्या बागायतदारांसाठी कृषी विभागाकडून योजना राबवणे गरजेचे असल्याचे शेतकर्यांनी सांगितले. यावर फुंडकर योजनेतील तरतुदीसाठी सकारात्मक चर्चा सुरु आहे. त्याला लवकरच प्रशासकीय मान्यता मिळेल असे संचालक मोते यांनी सांगितले.