सुमोच्या धडकेने वारकऱ्याचा जागीच मृत्यू

खेड:- मुंबई गोवा महामार्गावरील भरणे जाधववाडी नजीक सुमो व्हॅनच्या धडकेने तानाजी दाजी शिंदे (रा. घोगरे-जाखनवाडी खेड) या वारकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी घडली. अपघातानंतर पलायन केलेल्या सुमो चालकास वेरळ रेल्वे फाटा येथे पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतले.

घोगरे-जाखनवाडीतील रहिवाशी असलेले तानाजी शिंदे हे भरणे येथील वारकरी मठात आले होते. तेथून ते भरणे येथे चालत जात होते. याचवेळी मुंबईहून लांजाच्या दिशेने जाणाऱ्या सुमो व्हॅनने त्यांना धडक दिली. या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर सुमो चालकाने पलायन केले. स्थानिक ग्रामस्थांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर तातडीने घटनास्थळी पोहोचले. वेरळ रेल्वे फाटा येथे सुमो चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले.