सुमति अर्हम् जैन मंडळातर्फे जांभेकर विद्यालयात गणवेश वाटप

रत्नागिरी:- शहरातील सुमति अर्हम् जैन मंडळातर्फे सौ. गोदुताई जांभेकर विद्यालयात गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वितरण करण्यात आले. विविध सामाजिक व शैक्षणिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या अर्हम् जैन मंडळाने नुकताच गणवेश वाटपाचा कार्यक्रम विद्यालयात केला.

या कार्यक्रमाला सुमति अर्हम् मंडळाचे पदाधिकारी सचिन जैन, अरविंद जैन, अक्षत संघवी, दिक्षीत जैन, दीपक संघवी, प्रदीप जैन, विक्रम जैन, मानस जैन आणि नीलेश शहा उपस्थित होते. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीने १९२५ मध्ये जांभेकर विद्यालय सुरू केले. हे रत्नागिरी शहरातील जुने विद्यालय आहे. येथे शहर आणि आसपासच्या गावांतून विद्यार्थी शिकण्यास येतात. एसटी बसस्थानकाच्या समोरच असणाऱ्या या विद्यालयात गरीब विद्यार्थीसुद्धा दर्जेदार शिक्षण घेत आहेत. काही विद्यार्थ्यांना गणवेशाची आवश्यकता असल्याचे समजल्यानंतर सुमति अर्हम् जैन मंडळाने सर्व गरजू विद्यार्थ्यांना गणवेश दिले. याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक अनिल चव्हाण यांनी मंडळाचे आभार मानले.