सुदेश मयेकर यांना शिवसेनेकडून नगराध्यक्ष पदाची ऑफर

रत्नागिरी:- राष्ट्रवादी काँग्रेसचे पायउतार झालेले जिल्हाध्यक्ष सुदेश मयेकर यांचा शिवसेनेतील (शिंदे गटात) प्रवेश जवळजवळ निश्चित झाला आहे. किंगमेकर किरण उर्फ भैय्या सामंत यांचा ७ जानेवारी २०२४ ला वाढदिवस असून, या दिवशी सुदेश मयेकर समर्थकांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार आहेत. भविष्यातील पालिकेच्या निवडणुकीतील सुदेश मयेकर शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार असण्याची शक्यता आहे.

पक्षनिष्ठेसाठी मित्राचाही हात सोडलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष सुदेश मयेकर काही राजकीय घडामोडींमुळे पुन्हा बालमित्र आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत जाण्याचे निश्चित झाले आहे. सुदेश मयेकर यांनी राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यानंतर पक्षाला वेगळी ऊर्जा मिळाली होती; परंतु पक्षांतर्गत काही वादामुळे आणि जिल्हाध्यक्ष म्हणून केलेल्या शिफारशींचा वरिष्ठांनी विचार न केल्याने त्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त सुदेश मयेकर यांना एकत्र येण्याबाबत सामंत यांची आई स्वरूपा सामंत यांनी सुदेश मयेकरांना साद घातली होती. त्याला मयेकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे; परंतु शिवसेनेत घेताना त्यांचे पुनर्वसन व्हावे, यासाठी आगामी पालिकेच्या निवडणुकीमध्ये ते नगराध्यक्षपदाचे उमेदवार असण्याची शक्यता नाकारता येत नाही; मात्र हा पक्षप्रवेश ७ जानेवारीला किंगमेकर आणि उद्योजक किरण सामंत यांच्या वाढदिवसादिवशी होणार आहे. सुदेश मयेकर आपल्या समर्थकांसह उदय सामंत आणि किरण सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.