सीएनजीला दणका; नगर परिषदेकडून डिपॉझिट जप्त 

नळपाणी योजनेची नवी पाईपलाईन फोडल्याने निर्णय 

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरात गॅस पाईपलाईन टाकणाऱ्या सीएनजी कंपनीला नगर परिषदेने चांगलाच दणका दिला आहे. गॅस पाईपलाईन टाकताना ठिकठिकाणी नळपाणी योजनेची नवी पाईपलाईन फोडली गेली आहे. पाईपलाईन फुटल्याने दररोज हजारो लिटर पाणी वाया जात असून पाणी असून टंचाई निर्माण झाली आहे. बेपर्वाईने खोदकाम करणाऱ्या सीएनजी कंपनीच्या डिपॉझिट रक्कमेतून पाईपलाईन दुरुस्त्या करण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या सभेत घेण्यात आला. नागरिकांना पाणी मिळण्यासाठी आधी तत्काळ दुरुस्त्या करा आणि होणारा खर्च सीएनजीच्या डिपॉझिट रक्कमेतून अदा करा असे आदेश नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांनी सभागृहात अधिकाऱ्यांना दिले. 

रत्नागिरी शहरात पाणी योजनेचे काम पूर्णत्वास आले आहे. या दरम्यान निम्म्या शहरात सीएनजी पाईपलाईन टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. शहरात अनेक ठिकाणी सीएनजी पाईपलाईनसाठी खोदकाम करताना पाण्याची नवीन टाकण्यात आलेली पाईपलाईन फोडण्यात आली आहे. हाच मुद्दा भाजपचे नगरसेवक समीर तिवरेकर, मुन्ना चवंडे यांनी मांडला. 

नव्या पाणी योजनेच्या पाईलाईनला अनेक ठिकाणी गळत्या आहेत. नव्या चाव्या देखील घराब झाल्याचा मुद्दा मुन्ना चवंडे, राजेश तोडणकर यांनी सभागृहात मांडला. नगर परिषदेच्या पाणी विभागातील कर्मचारी प्रचंड दबावाखली काम करत असून त्यांना दैनंदिन कामासह नव्या जोडण्या द्यावा लागत असल्याचे भाजप नगरसेवक चवंडे यांच्याकडून सांगण्यात आले. यावर नगराध्यक्ष साळवी यांनी नव्या जोडण्याचा ठेका खाजगी कंपनीला देण्यात आल्याची माहिती दिली. मात्र, पाईपलाईन फुटल्याच्या घटना घडल्या असतील तर स्थानिक नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना पत्र देऊन हरकत नोंदवा अशा सूचना केल्या. 
 

मात्र, नव्या योजनेची पाईपलाईन सीएनजी गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी होणाऱ्या खोदाईमुळे फुटत असल्याचे सभागृहात भाजप नगरसेवकांनी निदेर्शनास आणून दिले. सीएनजीच्या खोदाईमुळे फुटणारी पाईपलाईन दुरुस्त करून देण्यास पाणी योजनेच्या ठेकेदाराने नकार दिला असून या कामासाठी जादा दर आकारला जाईल असे ठेकेदाराकडून सांगण्यात आले आहे. यामुळे वाढीव खर्चाला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित करण्यात आला. यावर नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी नव्या योजनेच्या फुटणाऱ्या प्रत्येक पाईपलाईनसाठी यापुढे सीएनजी कंपनीच जबाबदार असेल असे सभागृहात सांगितले. सीएनजीच्या खोदाईमुळे फुटलेल्या पाईपलाईनचा सर्व्ह करा आणि त्यांनी नगर परिषदेकडे भरलेल्या डिपॉझिट मधून पाईपलाईन दुरुस्तीची कामे तात्काळ करून घ्या असे आदेश नगराध्यक्ष यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.