सिव्हिल सर्जनविरूद्ध डॉ. शेरखानेंची तक्रार

वेतन रोखले; पदाचा गैरवापर केल्याचा आरोप

रत्नागिरी:- जिल्हा शासकीय रुग्णालयाचा कारभार गाजत असताना जिल्हा रुग्णालयातील तत्कालीन निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रकांत शेरखाने यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांच्या कामकाजाबाबत राज्याच्या आरोग्य उपसंचालकांकडे तक्रार केली आहे.
त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून माझे वेतन रोखून ठेवले आहे. याचा माझ्या उदरनिर्वाहावर मोठा विपरित परिणाम झाला आहे. त्यामुळे
डॉ. फुले यांची चौकशी करून त्यांच्या वेतनातून माझ्या भविष्य निधी खात्यावरील बुडलेले व्याज व वैयक्तिक कर्जावरील व्याज वसूल करावे, असे तक्रारीत म्हटले आहे. 

डॉ. शेरखाने यांनी पत्रकारांना या तक्रारीबाबत माहिती दिली. त्या तक्रारींची प्रतदेखील प्रसारमाध्यमांना दिली. तक्रारीत म्हटले आहे की,  ते निवासी जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून काम करत होते; मात्र डॉ. संघमित्रा फुले कोणत्या ना कोणत्या कारणावरून त्रास देत होत्या. डिसेंबर २०१९ मध्ये मी सेवानिवृत्त झालो असतो. शासनाने दिलेल्या मुदतवाढीत मी कार्य करत आहे.  मे २०२० मध्ये मानदुखी व पाठदुकीचा त्रास होत होता. कोविड काळात सातत्याने काम केल्याने त्यात अधिक भर पडली. त्यासाठी वैद्यकीय करणास्तव रजेची मागणी केल्यास ती नाकारण्यात आली. कार्यालयात रितसर अर्ज करूनही त्याची दखल घेतली नाही. हजेरी पटावर अनधिकृत गैरहजर, असा शेरा मारून लेखा शाखेत तोंडी सांगून माझे वेतन रोखले. मला कारणे दाखवा नोटीस दिली. दोन्ही नोटिसांना खुलासा दिला तरी त्यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. ४ महिने लोटले तरी त्यावर निर्णय झाला नाही. मार्च ते १४ एप्रिल २०२१ अखेरचे वेतन रोखून ठेवण्यात आले.

मी मे, जूननंतर पुन्हा माझ्यावर सोपवलेले काम पूर्ण करून सर्व खातरजमा करून रजेवर गेलो. ३० जून २०२१ ला पुन्हा सेवेत हजर झालो. त्यानंतरही त्यांनी हजेरीपटावर अनधिकृत गैरहजर असा शेरा मारला. यामुळे माझा उदरनिर्वाह हक्क डावलला आहे. माझे वेतन रोखून धरल्यामुळे कौटुंबिक गरजा भागवणे तसेच गृहकर्ज व वाहनकर्ज फेडण्यासाठी मला खासगी बॅंकेचे कर्ज घ्यावे लागले. डॉ. फुले पदाचा गैरवापर करीत आहेत. त्यांची चौकशी करून त्यांच्या वेतनातून माझ्या भविष्य निधी खात्यावरील बुडालेले व्याज व वैयक्तिक कर्जावरील व्याज वसूल करावे, असे तक्रार अर्जात म्हटले आहे.