सिव्हिलमधील स्त्रीरोग तज्ज्ञ, प्रसुती तज्ज्ञ पदावर डॉ. विनोद सांगवीकर यांची नियुक्ती

रत्नागिरी:- जिल्हा शासकीय रुग्णालयात रिक्त असलेल्या स्त्रीरोग तज्ज्ञ व प्रसुती तज्ज्ञ या रिक्त असलेल्या पदावर डॉ. विनोद सांगवीकर यांची पालघर येथून जिल्हा शासकीय रुग्णालयात उसनवारी तत्वावर नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनी रुग्णालयाला टाळे लावण्याचा इशारा दिला होता. याविषयात पालकमंत्री उदय सामंत यांनी यात विशेष लक्ष घातल्याने ग्रामीण भागातून प्रसुतीसाठी येणार्‍या गरीब महिलांचे हाल थांबणार आहेत.

जिल्हा रुग्णालयातील प्रसुती व स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. विनोद सांगवीकर यांना बढती मिळाल्याने त्यांची बदली पालघर जिल्हा रुग्णालयात करण्यात आली होती. त्यांच्या बदलीमुळे रत्नागिरीतील जिल्हा रुग्णालयात एकही स्त्रीरोग व प्रसुतीतज्ज्ञ उपलब्ध नसल्याने, प्रसुतीसाठी येणार्‍या महिलांना डेरवण, कोल्हापूरातील सीपीआर किंवा खासगी रुग्णालयात हलवावे लागत होते. त्यामुळे काही दुर्देवी घटनाही घडल्या होत्या. गरीब महिलांना हजारो रुपये प्रसुतीसाठी मोजावे लागत होते.

याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनी प्रसुती किंवा स्त्रीरोग तज्ज्ञ न आल्यास रुग्णालयाला टाळे ठोकण्याचा इशारा दिला होता. याप्रकरणात पालकमंत्री उदय सामंत यांनी विशेष लक्ष घातले होते. त्यामुळे चिपळूण कामथे उपजिल्हा रुग्णालयातील येथील स्त्रीरोगतज्ज्ञांना दोन-दोन दिवस जिल्हा रुग्णालयात सेवा बजावण्याबाबत जिल्हा शल्यचिकित्सकांनी सूचना केल्या होत्या. त्यातच पालकमंत्र्यांनी आरोग्यमंत्र्यांकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे डॉ. विनोद सांगवीकर यांना पालघर येथून उसनवारी तत्वावर पुढील आदेश होईपर्यंत रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात हजर होण्याचे आदेश आरोग्य सहसंचालकांनी दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील प्रसुतीसाठी येणार्‍या स्त्रीयांचा प्रश्न सुटणार आहे.