एपीआय मनोज भोसले यांच्यावर फुल्लाचा वर्षावर करत निरोप
रत्नागिरी:- तुम्ही कोणत्याही ‘अधिकारी’पदावर असा, पद मोठे असो अथवा छोटे, तुम्ही पदावर असताना आपल्या सोबतच्या कर्मचार्यांशी कसे वागता. याची पोहच पावती एकतर सेवानिवृत्तीनंतर किंवा बदली झाल्यानंतर मिळते. अशीच एक घटना रत्नागिरीतील ग्रामीण पोलीस स्थानकात घडली आहे. पोलीस स्थानकात सहाय्यक पोलीस निरिक्षक म्हणून कार्यरत असलेले मनोज भोसले यांची देवरुख येथे बदली झाली. सहकार्यांनी त्यांच्या निरोपाचा सोहळा ठेवला होता. सत्कार करुन फुलांच्या वर्षावात त्यांना निरोप देण्यात आला. मात्र यावेळी सर्वच कर्मचार्यांच्या डोळ्यात अश्रू पहायला मिळाले. आपला हक्काचा वरिष्ठ बदलून गेल्यानंतर आपण पोरके झाल्याची भावना यावेळी कर्मचार्यांमध्ये दिसत होती.पोलीस स्थानकातून अनेक अधिकारी बदलून गेले मात्र मनोज भोसले यांची बदली झाल्यानंतर ते सहकार्यांशी कसे वागले असतील यांची पोहचपावतीच त्यांना सहकार्यांनी दिली.
लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस निरिक्षकांच्या जिल्ह्याबाहेर तर सहाय्यक पोलीस निरिक्षकांच्या जिल्ह्याअंतर्गत बदल्या करण्यात आल्या. गेले वर्षभर ग्रामीण पोलीस स्थानकात कार्यरत असलेले मनोज भोसले हे सहाय्यक पोलीस निरिक्षक होते. वर्षभरात त्यांनी आपल्या कामासोबतच सहकारी कर्मचार्यांमध्ये आपलेपणा निर्माण केला होता. आपण वरिष्ठ अधिकारी असलो तरी सोबतचे सहकारी कदाचीत पदाने लहान असतील पण ते आपलेच सहकारी आहेत. या भावनेने त्यांनी वर्षभर त्यांच्या सोबत काम केले. पोलीस खात्यात काही निवडकच अधिकार्यांना कर्मचार्यांकडून सन्मान मिळतो. त्याला कारण असते त्यांचा स्वभाव, अधिकारी म्हणून कार्यरत असताना सर्वज जण सॅल्यूट करतात. तो त्यांच्याही कामाचा एक भाग असतो. मात्र अधिकार्यांची बदली झाल्यानंतर सर्वच कर्मचार्यांच्या डोळयात पाणी येणे हे त्या अधिकार्यांच्या कामाची, कार्यपद्धतीची पोहचपावती असते.
सहाय्यक पोलीस निरिक्षक म्हणून सेवेत असलेले मनोज भोसले यांनी यापुर्वी शहर पोलीस स्थानकात अधिकारी म्हणून काम केले होते. यावेळीही त्यांनी सोबतच्या सहकार्यांसह जनतेशी उत्तम संवाद ठेवला होता. पोलीस अधिकारी असण्यापेक्षा आपल्याच कुटूंबातील सदस्य असल्यासारखी त्यांची वागणूक ग्रामीण पोलीस स्थानकात गेल्यानंतरही कायम होती. त्यांच्या उत्तम संवादामुळेच सहकार्यांनी त्यांना अपेक्षित नसलेला निरोप दिला. यावेळी त्यांच्या पत्नी तथा पोलीस उपनिरिक्षक मुक्ता भासले, ग्रामीणच्या पोलीस उपनिरिक्षक मीरा महामुने यांच्यासह सर्व पोलीस अंमलदार यावेळी उपस्थित होते.









