साहिल मोरेच्या प्रियसीला अटकपूर्व जामीन मंजूर

रत्नागिरी:- शहरानजीकच्या साईभूमीनगर येथे साहिल मोरे (22, ऱा अलावा रत्नागिरी) याने आत्महत्या केल्याची घटना 21 ऑक्टोबर 2022 रोजी घडली होती. मैत्रिणीच्या फ्लॅट वर तो आत्महत्या केलेल्या स्थितीत आढळून आला होता. त्यानंतर साहिलची बहिणी कृतिका मोरे हिने साहिलला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी प्रेयसी विरोधात तक्रार दाखल केली होती. मिताली अरविंद भाटकर (24, ऱा तोणदे रत्नागिरी) असे या प्रेयसीचे नाव आह़े. अटकेच्या भीतीने मिताली हिने सत्र न्यायालयापुढे अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होत़ा.

यावेळी न्यायालयाने निरीक्षण नोंदवले की, साहिल व मिताली हे दोन्ही कायद्याने सज्ञान होत़े त्यामुळे मिताली हिने लग्न करण्यास नकार देवून साहिलने आत्महत्या करण्यास चिथावणी दिली. अथवा प्रवृत्त केले, असे म्हणता येणार नाही, असे सांगत न्यायालाने न्यायालयाने मिताली हिला 15 हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करण्यात केला. मात्र दोषारोपपत्र दाखल होईपर्यत दर रविवारी तपास अधिकारी यांच्यासमोर हजेरी लावण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत़.

सविस्तर वृत्त असे की, साहिल मोरे आणि मिताली हीचे गेली 2-3 वर्षे प्रेमसंबंध होते. या प्रेमातून त्यांच्या आणाभाका झाल्या होत्या. त्यानंतर साहिलने तिच्याकडे लग्न करण्याविषयी बोलणी केली. मात्र मिताली टाळाटाळ करत होती. तिने लग्नाला नकार दिला होता. यावरून त्यांच्यात वारंवार भांडणं होत होती. लग्नास तिने नकार दिल्यामुळे साहिल घाबरला होता. आपल्या प्रेमाबद्दल अनेकांना माहिती आहे. मात्र आपण लग्न केले नाही तर आपली बदनामी होईल याची त्याला भीती वाटत होती.

21 ऑक्टोबर 2022 रोजी साहिल हा शहरालगतच्या साईभूमीनगर येथे मैत्रिणीच्या फ्लॅटवर आत्महत्या केलेल्या स्थितीत आढळला. त्याच्या आत्महत्येपूर्वी सकाळी मिताली फ्लॅटवर होत़ी. मात्र त्यानंतर मितालीला साहिल फ्लॅटच्या किचनमध्ये गळ्यात पट्टा अडकवून गळफास घेतल्याच्या स्थितीत आढळला. दरम्यान साहिल याने गळफास घेतलेला पाहून मिताली ही पूर्णपणे घाबरून गेली होती. तिने घाबरलेल्या स्थितीतच साहिलच्या बहिणीला फोन केला. मितालीने मन धीट करून त्याच्या मानेभोवती असलेली दोरी तिने चाकूच्या सहाय्याने कापून मृतदेह खाली उतरवला होत़ा. तोपर्यंत साहिलची बहीण घटनास्थळी पोहोचली होती. तिने एका मित्राच्या मदतीने जिल्हा शासकीय रूग्णालय दाखल केल़े. तिथे डॉक्टरांनी साहिल याला तपासून मृत घोषित केले. साहिलच्या मृत्यूची बातमी कळताच सारे कुटुंब हळहळले. अचानक मृत्यूने कुटुंबाने ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला होता. कारण सकाळी साहिल घरातून निघताना व्यवस्थित घरातील व्यक्तींशी बोलून गेला होता. असे असेल तर तो आत्महत्या का करेल असे अनेक प्रश्न कुटुंबीयांना पडले होते. त्यांनी पोलिसांसमोर संशय व्यक्त केला होता. त्यानुसार पोलिसांनी तपास केला. मात्र प्रथम दर्शनी ती आत्महत्या असल्याचे पोलिसांनी म्हटले होते. त्यानंतर शवविच्छेदन अहवालातही आत्महत्याच असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान साहिलच्या बहिणीने शहर पोलिसांत मिताली विरोधात तक्रार दाखल केली. मिताली हिच्यावर भादंवि कलम 306 नुसार आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.