सासू-जावयाचा नवा फंडा! बांबूपासून शोधला उत्पन्नाचा मार्ग

रत्नागिरी:- कलेला बुध्दीची जोड देत मूळच्या कराड आणि सध्या पानवल येथे वास्तव्यास असलेल्या सासू-जावयाने बांबूपासून उदरनिर्वाहाचा पर्याय शोधून काढला आहे. त्यांनी कलेचं सोनं करत बांबूपासून शिबद्या, खुराडे, मोठे हारे, छोटे हारे, खुर्दे, डोक्यातील टोपी, फुल परडी आकर्षक रंगाढंगात सजवण्याचं अत्यंत खुबीने काम केलं आहे. 

संजय जाधव, चंदा माने अशी त्यांची नावे आहेत. हे दोघं नात्यानं जावई-सासू आहेत. चंदा माने या आपल्या मुलीकडे भाडयाच्या खोलीत राहतात. त्यांचं कुटुंब मूळचं कराड येथील असून वास्तव्यास अनेक वर्ष पानवल येथे आहेत. जावई व सासू अल्प शिक्षित आहेत. त्यांनी आपला पारंपरिक व्यवसायातून उदरनिर्वाह कसा करता येईल यासाठी मार्ग शोधला. मात्र आपण पारंपारिक वस्तूला आधुनिकतेच्या दुनियेत वेगळया पध्दतीने कसं देता येईल याचाही विचार केला. यातूनच त्यांना कल्पना सूचली ती सांगली, सातारा, कराड या ठिकाणी टोमॅटो, फळबागांसाठी कडक अशी फायबरची वायर वापरली जाते. या वायरचा वापर करुन त्यांनी बांबूच्या कामटयांसोबतच लाल, पिवळया, हिरव्या रंगाच्या वायरने आकर्षक असे शिबडे (भाकरीची टोपली), खुराडे, मोठे हारे, छोटे हारे, खुर्दे, दीपावलीतील बांबूंचे आकाश कंदील, फुल परडी उत्तमप्रकारे बनवल्या. वैशिष्टय म्हणजे जावई संजय जाधव यांनी बनवलेल्या वस्तू सासूला बनवता येत नाहीत. तर सासूने बनवलेल्या वस्तू जावयाला बनवता येत नाहीत. त्यामुळे दोघंही आपल्या पध्दतीने वेगवेगळया कल्पनेने या वस्तू बनवतात. यासाठी त्यांना बरेच कष्ट घ्यावे लागले. वस्तू बनवण्यासाठी लागणारा बांबू रत्नागिरीत मिळत नसल्यानेलांजा, कणकवली आदी ठिकाणाहून आणावा लागतो. त्यासाठी वाहतुकीचा मोठा खर्च येत असूनही त्यांनी अल्प दरात वस्तू विक्रीसाठी ठेवल्या आहेत. 100 ते 800 अशा दरम्याने त्यांची विक्री आहे. या वस्तू पानवल येथे कार्नरला आकर्षक पध्दतीने सजवण्यात आल्या आहे. जाणार्‍या येणार्‍या वाहनचालकांचे मन आकर्षून घेतात. प्रत्येक वाहनचालक ठिकाणी थांबल्याशिवाय राहत नाही.