सासूला शिवीगाळ, मारहाण केल्याप्रकरणी जावयाविरोधात गुन्हा दाखल

रत्नागिरी:- तालुक्यातील नाखरे येथे दारुच्या नशेत सासूला शिवीगाळ व मारहाण करुन तिला धक्काबुक्की केल्याप्रकरणी जावयाविरोधात पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मारहाणीची ही घटना रविवार 29 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7.30 वा.सुमारास घडली.अंकुश चंद्रकांत घवाळी (रा.नाखरे भवगतीवाडी,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित जावयाचे नाव आहे.त्याच्याविरोधात पत्नी अनुष्का अंकुश घवाळी (30,रा. नाखरे भवगतीवाडी,रत्नागिरी) हिने पूर्णगड पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार, अनुष्काची आई जयश्री गजानन सोलकर (60) हिच्या डोक्यावर परिणाम झाल्याने ते घरी सारखी काहीतरी बडबड करत असते. रविवारी सायंकाळी अंकुश दारु पिउन घरी आला होता. तेव्हाही त्याची सासू काहीतरी बडबड करत होती. तिच्या बडबडीचा राग आल्याने अंकुशने  तिला शिवीगाळ करत हातांच्या थापटांनी मारहाण केली. त्यानंतर तिला भिंतीवर जोरात ढकलून दिले. यात सासूच्या डोक्याला दुखापत झाल्याने रक्तस्त्राव होउन ती गंभीर जखमी झाली.दरम्यान तिला उपचारांसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले.तिथे खबर घेउन ती शहर पोलिस ठाण्यातून पूर्णगड पोलिसांकडे पाठवण्यत आल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला.