सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पतीसह चौघांवर गुन्हा दाखल

चिपळूण:- शहरातील पाग विभागातील कोमल दिलवाले या विवाहित महिलेने आपल्या चिमुकल्यासमोरच आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी घडली. या घटनेनंतर संबंधित महिलेच्या माहेरकडील लोकांनी चिपळूण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून सासू, सासरे, पती आणि नणंदेविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार होऊ देणार नाही, अशी भूमिका माहेरच्यांनी घेतली होती. अखेर या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये कोमल हिचे सासरे माणिक दिलवाले, सासू सौ. कल्पना माणिक दिलवाले आणि पती सचिन माणिक दिलवाले (सर्व रा. चिपळूण) व नणंद सौ. नंदिनी अलोपे (रा. पुणे) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोमल हिचे भाऊ ऋषिकेश कुलभूषण निधानकर (३२, रा. हिंगोली) यांनी याबाबतची तक्रार चिपळूण पोलिस ठाण्यात केली आहे. त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यामध्ये या बाबतचा कोमलचा भाऊ ऋषिकेश निधानकर यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, कोमल कुलभूषण निधानकर या २७ वर्षीय बहिणीचा २६-५-२०१९ रोजी चिपळुणातील सचिन माणिकराव दिलवाले यांच्याशी विवाह झाला होता. ती उच्चविद्याविभूषीत होती. तिने बी. ई. इलेक्ट्रॉनिक्सपर्यंत शिक्षण घेतले होते. लग्र झाल्यानंतर तिचे पती, सासू, सासरे यांच्याकडून तिचा मानसिक छळ सुरू झाला व सातत्याने डिवचू लागले. त्यामुळे तिला आत्महत्येस प्रवृत्त करण्यास हेच जबाबदार आहेत, अशी तक्रार कोमल यांचा भाऊ ऋषिकेश याने चिपळूण पोलिस ठाण्यात दिली आहे. तक्रारीमध्ये सासरे माणिक दिलवाले, सासू सौ. कल्पना माणिक दिलवाले आणि पती सचिन माणिक दिलवाले व नणंद सौ. नंदिनी अलोपे यांनी तिचा छळ केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. लग्नाच्यावेळी सासू सासऱ्यांनी कोमल हिला, तुला नोकरी करण्याची गरज नाही, असे सांगितले होते. परंतु लग्न झाल्यानंतर त्यांनी नोकरी करण्यासाठी तगादा लावला.

अनेकवेळा पैशांचीदेखील मागणी झाली. त्यामुळे कोमल हिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. त्यामुळे तिच्या मृत्युला तिचे सासू, सासरे, पती आणि नणंद हेच जबाबदार आहेत, अशी तक्रार चिपळूण पोलिस ठाण्यात केली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.

सुशिक्षित घरातील घटना…

या प्रकरणामध्ये माहेरच्या लोकांनी दिलेल्या तक्रारीनुसार सासू, सासरे व पतीविरूद्ध तक्रार दाखल केली आहे. यामधील सासू कल्पना दिलवाले या शिक्षिका असून सासरे माणिक दिलवाले हेदेखील निवृत्त प्राध्यापक आहेत. आत्महत्या केलेल्या कोमल यांनी अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले होते. त्यामुळे उच्चविद्याविभूषित घरातील हे प्रकरण असून पोलिसांस प्रकरणाचा छडा लावण्याचे आव्हान आहे.