सावर्डे येथे दुचाकी कठड्यावर धडकून दुचाकीस्वाराचा मृत्यू

चिपळूण:- सावर्डे ते दुर्गेवाडी मार्गावर काजचे वाकण येथे दुचाकी कठड्यावर धडकून वृद्धाचा मृत्यू झाला. मनोज नीलकंठ पोंक्षे (वय ७२, रा. पाग जोशीआळी, चिपळूण) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. हा अपघात ५ मे रोजी सकाळी ९.०० वाजता घडला. याबाबतची तक्रार सायंकाळी १६.४५ वाजता चिपळूण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज पोंक्षे हे त्यांच्या स्कूटरवरून सावर्डेकडून दुर्गेवाडीकडे जात होते. काजचे वाकण येथील तीव्र उतारावर त्यांच्या दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी रस्त्याच्या बाजूला असलेल्या सिमेंटच्या कठड्याला जोरदार धडकली. या अपघातात त्यांच्या डोक्याला, तोंडाला आणि डाव्या खांद्याला गंभीर मार लागला आणि रक्तस्त्राव झाला. त्यांना उपचारासाठी डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी फिर्यादी संजय शांताराम कदम (वय ५०, रा. फुस्स कदमवाडी, ता. चिपळूण) यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी मनोज नीलकंठ पोंक्षे (मयत) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.