दगड मारल्याने एक जखमी
चिपळूण:- तालुक्यातील सावर्डे येथील खोतवाडी (कदमवाडी) येथे घराच्या कंपाउंडमधील गवत काढण्यावरून झालेल्या वादात एकाला दगड फेकून मारून जखमी केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सागर चंद्रकांत घाग (वय ३५, सध्या रा. ऐरोली, नवी मुंबई) हे आपल्या मूळ गावी सावर्डे खोतवाडी येथे आले होते. १६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९:३० वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घराच्या कंपाउंडच्या आवारात वाडीतील काही लोक गवत (कवळ) काढत होते.
यावेळी फिर्यादी सागर घाग आणि त्यांच्या पत्नीने “आमच्या कंपाउंडमधील गवत कोणाला विचारून काढत आहात?” अशी विचारणा केली. याच कारणावरून आरोपींनी त्यांच्याशी वाद घातला.
गवत काढण्यावरून झालेल्या वादात आरोपी श्रीधर शंकर चव्हाण आणि जयश्री श्रीधर चव्हाण (दोन्ही रा. सावर्डे खोतवाडी) यांनी फिर्यादी आणि त्यांच्या पत्नीला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. इतकेच नव्हे तर, आरोपी श्रीधर चव्हाण याने तेथे असलेला दगड सागर घाग यांच्या दिशेने भिरकावला. हा दगड त्यांच्या डोक्याला लागल्याने ते जखमी झाले आहेत.
या घटनेप्रकरणी सागर घाग यांनी दिलेल्या तक्रारीवरून सावर्डे पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १२५(अ), ३५२, १३१ आणि ३(५) नुसार गुन्हा रजिस्टर नंबर ११/२०२६ दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.









