साळवी स्टॉप येथे टेम्पो – दुचाकी अपघातात स्वाराचा मृत्यू

रत्नागिरी:- बेदरकारपणे टेम्पो चालवून रस्त्याच्या विरुध्द दिशेला जात समोरुन येणार्‍या दुचाकी धडक देत अपघात केला. यात दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या प्रौढाचा उपचारांदरम्यान जिल्हा शासकिय रुग्णालयात मृत्यू झाला. अपघाताची ही घटना शनिवार 2 मार्च रोजी रात्री 11.15 वा.साळवीस्टॉप येथील हॉटेल गारवा समोरील रस्त्यावर घडली.

विनायक अनंत रहाटे (50,मुळ रा.जांभारी गुहागर सध्या रा.थिबा पॅलेस,रत्नागिरी) असे अपघातात मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे. तर दुचाकी चालक सिध्दांत दिवाकर मेस्त्री (24,रा.मेर्वी,रत्नागिरी) याच्यावर उपचार सुरु आहेत. विनायक रहाटे आणि सिध्दांत मेस्त्री हे दोघेही डी मार्टमध्ये कामाला आहेत. शनिवारी रात्री 11 वा. डी मार्टचे कामकाज आटोपल्यानंतर हे दोघेही सिध्दांतची दुचाकी होंडा डिओ (एमएच-08-एडब्ल्यू-8119) वरुन घराच्या दिशेने जात होते. त्याच सुमारास जावेद आयुब इनामदार (रा. इचलकरंजी,कोल्हापूर ) हा आपल्या ताब्यातील अशोक लेलँड दोस्त टेम्पो (एमएच-09-ईएम-6608) घेउन मारुती मंदिर ते साळवीस्टॉप असा येत होता. रात्री 11.15 वा.सुमारास ही दोन्ही वाहने साळवी स्टॉप येथील हॉटेल गारवा समोर आली असता रस्त्याच्या विरुध्द दिशेला येणार्‍या या टेम्पोने सिध्दांतच्या दुचाकीला समोरुन धडक दिली.
ही धडक इतकी जोरदार होती कि, दुचाकीचे पुढील चाक टेम्पोखाली जाउन दुचाकीवरील दोघेही रस्त्यावर पडले. या दोघांनाही तातडीने जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतू, रविवार 3 मार्च रोजी सकाळी 7.20 वा. दुचाकीवर पाठीमागे बसलेले विनायक रहाटे यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून याप्रकरणी अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक भगवान पाटील करत आहेत.